पवई तलावाजवळ एका ४० वर्षीय फळ-भाजी विक्रेत्याचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. त्याच्या अंगावर वार आणि जखमांच्या खुणा आहेत. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चांदशहावाली दर्गाच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याचही माहिती प्राप्त झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता पवईतील तुंगागाव येथे राहणाऱ्या राजेश हरिकरण भारद्वाज या व्यक्तीचा गळा चिरून खून केला असल्याचे समोर आले.
“त्याच्या शरीरावर मानेच्या उजव्या बाजूला आणि पोटात धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा आहेत. बाजूलाच काही फुटलेल्या बाटल्यांच्या काचा सुद्धा आढळून आल्या आहेत,” असे याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक हारगुडे यांनी सांगितले.
“राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून आम्ही अधिक तपास करत आहोत, असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक पूजा कल्याणी यांनी सांगितले.
माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (परीमंडळ १०) महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. गळा चिरुन पोटात वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी काही स्थानिकांचे जवाब नोंदविले आहेत. त्याच्या कुटुंबियांचेही जवाब नोंदवण्यात आले आहेत. “त्याचे पूर्वीचे कोणाशी वैर आहे का? याची माहिती आम्ही मिळवत आहोत. त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजची तपासणी सुरु आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले असून, त्याचा शोध सुरू आहे,” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“भारद्वाज याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी सुद्धा संध्याकाळी नशेत चालत जाताना सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलिसांना त्याच्याजवळून काही सुट्टे पैसे मिळून आले आहेत. त्याच्याजवळ असणारी दिवसभराची कमाई हिसकावून घेण्याच्या उद्देशाने नशेखोरांनी त्याच्या खून केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही परिसरातील नशेखोर आणि अभिलेखावरील गुन्हेगारांना ताब्यात घेवून चौकशी करत आहोत, असे याबाबत बोलताना गुन्हेप्रकटीकरण पथकाने सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.