पवई किडनी रॅकेटचा तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी या किडनी रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या हिरानंदानी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. निलेश कांबळे (३६) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून तो काम पाहतो. या कामासाठी त्याला देण्यात आलेले ८ लाख रुपये त्याच्या पनवेल येथील घरातून पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यापूर्वीही अशा प्रकरच्या केसेसमध्ये परवानगी मिळवून देण्यात आरोपीने मदत केल्याची पोलिसांना शंका असून, ते अधिक तपास करत आहेत.
“किडनी रॅकेटचा प्रमुख सूत्रधार भैजेंद्र भिसेन याच्या चौकशीत त्याने खोटी कागदपत्रे मंजूर करून घेण्यासाठी हिरानंदानी रुग्णालयाचा कर्मचारी निलेश याला ८ लाख रुपये दिल्याचे कबूल केल्यानंतर शनिवारी त्याला हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली. अजूनही काही रुग्णांची खोटी कागदपत्रे निलेशने मंजूर करून दिल्याची माहिती समोर येत असून, त्याबाबत आम्ही तपास करत आहोत”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
अवयव प्रत्यारोपण संमतीसाठी आलेली कागदपत्रे रुग्णालयाच्या नैतिकता समितीकडून मंजूर करून घेण्याची जबाबदारी ही निलेशकडे होती. किडनीदाता व रुग्णाचे बनवण्यात आलेले खोटे रेशनकार्ड, लग्नाचे प्रमाणपत्र, जन्माचे दाखले, आधारकार्ड व इतर कागदपत्रे मंजूर करण्यासाठी किडनी रॅकेटला निलेशने मदत केल्याचे समोर येत आहे.
आमच्या येथील मेडिकल सोशल वर्करचे किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगताच आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याचा सहभाग स्पष्ट होताच त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिसांना त्यांच्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत, असे याबाबत हिरानंदानी हॉस्पिटलतर्फे काढण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हणण्यात आले आहे.
जैस्वाल यांचा मुलगा किशन याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, जैस्वाल आणि भिसेन यांच्यात रुग्णालयाच्या खर्चासह २३ ते २५ लाख रुपयात किडनी प्रत्यारोपणाचा सौदा झाला आहे. किडनीदाता ठाकूर हिला ३ लाख रुपये देण्याचे ठरले असून, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिला हे पैसे दिले जाणार होते. आतापर्यंत भिसेन याला १५ वेळा विविध कामासाठी पैसे देण्यात आले आहेत. “या संदर्भात पोलिसांनी भिसेन याची डायरी जप्त केली असून, त्यात त्याने मिळालेल्या आणि खर्च करण्यात आलेल्या पैशांची तारीखवार माहिती लिहून ठेवलेली आहे”, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी बोलताना सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, किडनीदाता शोभा ठाकूरला मिळवून देण्यात भिसेन याच्या संपर्कात असणाऱ्या अजूनही काही दलालांना पकडण्यासाठी एक पथक गुजरातला रवाना झाले आहे. त्यांच्या अटकेनंतरच हे संपूर्ण वलय कसे पूर्ण झाले हे स्पष्ट होऊ शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.