सहार येथील एका नामांकित हॉटेलमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय तरुणाची कार मेकॅनिक असल्याचे भासवून ३३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कार डायनामो आणि एअर कंडिशनर कॉम्प्रेसर बदलण्याच्या बहाण्याने त्याची फसवणूक करण्यात आली आहे.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील साकी विहार रोडवर राहणारे तक्रारदार अनुराग मिश्रा हे रविवारी आर सिटी मॉलमध्ये चित्रपट पाहून आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह घरी परतत होते. ते पवईतील स्वामीनारायण चौकात आले असता, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना थांबण्याचा इशारा केला. ते थांबताच कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे दुचाकीस्वाराने मिश्रा यांना सांगितले. याचदरम्यान एक रिक्षा तिथे येवून थांबली.
“रिक्षा चालकाने मिश्रा यांना बोनेट उघडण्यास आणि कार चालू करण्याची विनंती केली. कारच्या आतून ठिणग्या बाहेर पडत असल्याचे सांगत मेकॅनिकला दाखवावे लागेल असे सांगितले,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मिश्रा यांनी जवळपास असणाऱ्या एखाद्या मेकॅनिकची माहिती विचारली असता ऑटोचालकाने तो मारुती सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका राजू मिस्त्रीला ओळखतो असे सांगितले. त्यानंतर रिक्षा चालकाने मिश्रा यांना गाडीसह जवळच्या इमारतीत घेवून जात मिस्त्रीला बोलावले.
“मिस्त्री यांनी कारची तपासणी केल्यानंतर कारचे एअर कंडिशनर कॉम्प्रेसर आणि डायनॅमो योग्यरित्या कार्य करत नसून ते बदलण्याची गरज असल्याचे मिश्रा यांना सांगितले. यासाठी ₹४०,००० खर्च येईल असेही सांगितले,” असे पवई पोलीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “पार्ट्स बदलण्याची मंजुरी देताच मेकॅनिकने काही पार्ट आणले आणि ते कारमध्ये बसवले. याबदल्यात मिश्रा यांनी मेकॅनिकला रुपये ३३,००० रोख दिले.”
दुसऱ्या दिवशी मिश्रा हे कार तपासणीसाठी मारुती सर्विस सेंटरला गेले असता त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्याने त्यांच्या कारला काहीही झाले नाही आणि बहुधा त्यांची फसवणूक झाली असल्याची माहिती दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच मिश्रा यांनी पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
“आम्ही भादवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे.” असे पवई पोलीस म्हणाले.
No comments yet.