प्रभावी पोलिसिंगसाठी आणि नागरी समस्या जाणून घेण्यासाठी २३ डिसेंबर रोजी पवई पोलीस ठाण्याच्या बीट क्रमांक ४ येथे मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परिमंडळ-१० पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी या बैठकीला संबोधित केले.
प्रमुख सणांच्या काळात परिसरात शांतता राखण्यासाठी समित्यांच्या विशेष बैठका बोलावल्या जातात. बैठकीला परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील, पोलीस निरीक्षक विजय दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक लालासाहेब डाके, पोलीस उपनिरीक्षक विशाल कोरडे, बीट अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासोबतच मोहल्ला समिती सदस्य उपस्थित होते.
छोट्या छोट्या वादांसाठी न्यायव्यवस्थेचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा आपसात चर्चा करून किंवा गावातील जबाबदार व्यक्तींच्या मध्यस्तीने स्थानिक पातळीवर वाद मिटवले जावेत या उद्देशाने ग्रामीण भागात तंटामुक्ती समिती तर शहरी भागात याचसोबत पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी मोहल्ला समिती स्थापन केली आहे.
पवई परिसरात सुद्धा या समितीच्या माध्यमातून अनेक प्रकरणे मिटवण्यात आणि प्रभावी पोलिसिंगसाठी मदत होत आली आहे. परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास व समाजात घडणाऱ्या अप्रिय घटनांना रोखण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याने पवई मोहल्ला समिती पोलिसांचे कान आणि डोळे बनली आहे. या समितीची बैठक नुकतीच पवई पोलीस ठाणे हद्दीतील बिट क्र. ४मध्ये पार पडली.
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयआयटी मार्केट बस स्टॉप, जैन मंदिर रोड, पदमावती रोड, चैतन्यनगर, हिरानंदानी या भागातील रोडसह विविध ठिकाणी उभ्या केलेल्या रिक्षा दारुडे आणि गुंडांचे आश्रयस्थान बनले आहे. येथील विविध भागातील अरुंद रस्त्यांवर पार्क करण्यात आलेल्या वाहनांमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन गाड्यांना अडथळे निर्माण होत असून, त्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आयआयटी मार्केट येथील पादचारी पूल तोडण्यात आला असून, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने रहिवाशांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे आणि त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा समस्या यावेळी मांडण्यात आल्या असून, समितीने पोलिसांच्या मदतीने हा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) विजय दळवी यांनी सांगितले.
झपाट्याने बदलणार्या वातावरणात पोलिसिंग करणे गुंतागुंतीचे होईल. लोकसहभागाशिवाय पोलिसिंग साध्य होऊ शकत नाही, असा दृष्टिकोन लोकशाहीने स्वीकारला आहे. त्यामुळे मोहल्ला कमिटी स्थापन करून त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याने घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच त्यांच्या क्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे हे मोहल्ला समित्यांचे मुख्य कार्य आहे, असे यावेळी बोलताना रेड्डी म्हणाले.
तसेच यावेळी मोहल्ला समिती सदस्यांनी आणि नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे पोलिसांच्या मदतीने लवकरच निवारण करण्याची हमी रेड्डी यांनी दिली.
No comments yet.