पवई येथील तुंगागाव भागातील राम मोबाईल शॉप फोडून त्यातील मोबाईल, ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.४२ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. शादाब मोमीन अन्सारी (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राम प्रसाद नारायण यांचे तुंगागाव येथे राम मोबाईल शॉप नामक मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. १४ ऑक्टोबर रोजी नियमित प्रमाणे १० वाजता आपले दुकान बंद करून ते घरी निघून गेले. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असताना त्यांना दुकानाच्या शटरला लावलेला टाळा तुटलेला असल्याचे आढळून आले. दुकानात प्रवेश करून पाहिले असता दुकानातील मोबाईलसह ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.४२ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी झाले होते. यासंदर्भात त्यांनी पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
“परिसरात कुठेही सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध नव्हते, त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कसोशीने तपास करणे आवश्यक होते. परिसरातील अभिलेखावरील सर्व आरोपींना ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली, मात्र काहीच उपयुक्त माहिती समोर येत नव्हती,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
“गुन्ह्याचा तपास सुरु असताना पूर्वी याच परिसरात राहणारा मात्र गुन्हा घडल्यानंतर मालवणी परिसरात पळून गेलेल्या शादाब बद्दल आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पाळत ठेवून त्याला चोरीचा मोबाईल विकायला आलेला असताना रुची हॉटेल, साकीविहार रोड येथून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लालासाहेब डाके यांनी सांगितले.
“आम्ही चोरीला गेलेल्या सर्व मोबाईल फोनचे आयएमईआय नंबर पाठवून माहिती मिळवली होती. त्यातील एक मोबाईल हा आरोपी वापरत होता,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे यांनी सांगितले.
आरोपीकडून पोलिसांनी चोरीस गेलेले मोबाईल, ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.२२,९७० रुपये किंमतीचे साहित्य हस्तगत केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पुढील तपासकामी गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.