मेडिकल कॉलेजेसना ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासह साथीदाराला पवई पोलिसांनी बँगलोर येथून अटक केली आहे. श्याम हरिप्रसाद यादव उर्फ आर के सिंह (३६) राहणार ओशिवरा आणि त्याचा साथीदार आनंद चांगदेव आघाव (३२) राहणार पंचकुटीर,पवई अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अभिषेक सिंग याचा पोलीस शोध घेत असून, ऑगस्ट महिन्यात यातील एक आरोपी योगेश पांचाळ याला पवई पोलिसांनी अटक केली होती.
मेडिकलला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना हेरून त्यांना तुम्हाला ऍडमिशन मिळवून देतो सांगून मोठी रक्कम घेत आणि काही दिवसातच आपले कार्यालय बंद करून गायब होत. अशा प्रकारे २०१४ पासून त्यांनी अनेक लोकांना गंडा घातला होता.
पुणेकर विद्यार्थी विराज निकम (२४) याने जून महिन्यात त्याला ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने असोसिएट कन्सल्टन्ट नामक कंपनीने ८.५ लाखाला फसवल्याची पवई पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पुण्याचेच एक डॉक्टर जोशी यांची सुद्धा ३२ लाख रुपयांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा सुद्धा याच पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंद करण्यात आला होता.
‘नामांकित इंग्रजी पेपरांमध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळवून देण्याबाबत ते जाहिरात करत. ज्याला पाहून अनेक लोक आपल्या मुलांच्या, नातलगांच्या मेडिकल ऍडमिशनसाठी यांच्याशी संपर्क करत. त्या लोकांकडून मोठी रक्कम वसूल करून हे आपले कार्यालय बंद करून निघून जात’, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
निकमने आपल्या बहिणीच्या ऍडमिशनसाठी २०१४ साली पवई प्लाझा येथे कार्यालय असणाऱ्या असोसिएट कन्सल्टन्टला ऍडमिशनसाठी संपर्क साधला होता. त्यासाठी ६० लाख रुपये खर्च असल्याचे त्यावेळी त्यांना सांगण्यात आले होते. त्यापैकी डिसेंबर २०१४ मध्ये निकम यांनी आरटीजीएसद्वारे आणि चेकद्वारे १५ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले होते. मात्र जून २०१५ पर्यंत ऍडमिशन न-झाल्यामुळे निकम यांनी पाठपुरावा केला असता नोव्हेंबर महिन्यात असोसिएट कन्सल्टन्टने त्यांना ६.५ लाखाची रक्कम परत केली. मात्र त्यानंतर ते रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले आणि धमकावू सुद्धा लागले. निकम त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले असता ते कार्यालय बंद करून निघून गेल्याचे समोर आले. डॉक्टर जोशी यांच्यासोबत सुद्धा असाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. ज्यानंतर निकम यांनी पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीची लेखी तक्रार केली.
भादंवि कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा नोंद करून पवई पोलिसांनी तपास सुरु केला होता.
‘पवई प्लाझा येथील कार्यालय बंद केल्यानंतर त्यांनी आयआयटी येथील एका इमारतीत आपले कार्यालय थाटल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मात्र त्या कार्यालयात सुद्धा ते येत नव्हते. ऑगस्ट महिन्यात यातील एक योगेश पांचाळ कार्यालयात आल्याची माहिती एका फेरीवाल्याकडून आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही लगेच त्याला तेथून अटक केली होती. चौकशीत त्यांनी ऍडमिशनच्या नावावर मुंबईसह इतर शहरातील लोकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती.’ असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी विनोद लाड यांनी सांगितले.
‘पाहिजे आरोपींचा शोध सुरु असतानाच यातील दोन आरोपीना बँगलोर पोलिसांनी अटक केल्याची माहिती आमच्या खास सूत्रांकडून आम्हाला मिळाली होती. ज्याच्या आधारावर बँगलोर येथून आम्ही दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
आरोपीना कोर्टात हजर केले असता त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाडसह पोलीस हवालदार कुंभार, पोलीस नाईक देसाई, जगताप, पोलीस शिपाई बांदकर यांच्या पथकाने काम केले.
No comments yet.