अल्पवयीन मुलाला मद्य पुरवठा करणाऱ्या बार वेटर, मॅनेजर विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे येथे नशेत अल्पवयीन मुलाने पोर्शे कार भरधाव चालवत दोन तरुणांना उडवल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणामुळे आता महाराष्ट्रसह मुंबई पोलीस अधिक सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी तपासण्या आणि धाडसत्र सुरु असून, पवई परिसरात एक अल्पवयीन मुलाला मद्य पुरवठा करणाऱ्या बार मधील व्यवस्थापक आणि वेटरवर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर मुंबई पोलिसांतर्फे संपूर्ण शहरात ऑल आऊट मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे यांना साकीविहार रोडवरील लोटस बार अँड रेस्टॉरंटमध्ये एका अल्पवयीन मुलाला मद्य दिले जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

“या माहितीच्या आधारे सपोनि कांबळे आणि पथकाने रात्री ११.४० वाजताच्या सुमारास बारवर छापा टाकला तेव्हा अल्पवयीन मुलाला दारू पुरवठा केला जात असल्याचे आढळून आले. मुलाकडे चौकशी केली असता त्याने आपले वय १६ वर्षाचे असल्याचे सांगितले. बारमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींला अल्कोहोल दिले जाणार नाही अशी सूचना स्पष्टपणे दर्शविलेली असतानाही अल्पवयीन मुलाला मद्य पुरवठा केल्याच्या गुन्ह्यात बारचा मॅनेजर आणि वेटरला आम्ही ताब्यात घेतले” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “बार मॅनेजर टेक बहादूर आयर (४७) आणि वेटर विकास राणा (३०) यांच्याकडे केलेल्या चौकशीत राणाने अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी बारमधून मुलाला दिलेली दारू जप्त केली आहे. अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.”

“आम्ही मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर बारचा मॅनेजर आणि वेटरविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५च्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा नोंद करत कारवाई केली आहे,” असे पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!