पवई पोलिसांनी अर्ध्या तासात शोधला प्रवाशाचा हरवलेला लॅपटॉप

मुंबई पोलीस (Mumbai Police) जगात उच्चस्थानी का आहे याची प्रचीती पवई पोलिसांनी (Powai Police) पुन्हा करून दिली आहे. आपले तपासाचे कौशल्य दाखवत पवई पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात एका प्रवाशाने नकळतपणे विसरलेली लॅपटॉप बॅग (laptop bag) शोधून काढत त्याला परत मिळवून दिली आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणारे हे काम असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल मुंबई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच मुंबईकरांकडून सुद्धा त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

राजेश प्रजापती हे आपल्या एका मैत्रिणीसोबत आरे कॉलोनी भागात फिरण्यासाठी आले होते. तिथे काही काळ व्यतीत केल्यानंतर दोघे रिक्षाने पवई तलाव (powai lake) येथे आले. “पवई भागात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले कि राजेश याच्याजवळची लॅपटॉपची बॅग कुठेतरी गहाळ झाली आहे. त्यांनी त्वरित पवई पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“माहिती मिळताच आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्वरित परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत ज्या रिक्षातून तक्रारदार यांनी प्रवास केला होता त्या रिक्षाचा नंबर मिळवला”, असे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) बुधन सावंत यांनी सांगितले.

“सिसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर शोध घेतला असता सदर रिक्षा ही गोवंडी भागात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आमच्या पथकाने रिक्षाचा शोध घेत रिक्षात विसरलेली लॅपटॉपची बॅग परत मिळवली,” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) विनोद पाटील यांनी सांगितले.

रविवारी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत आणि पोलीस निरीक्षक (Police Inspector) (प्रशासन) सुप्रिया पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप राजेश यांना सुपूर्द करण्यात आला.

आपला लॅपटॉप परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच प्रजापती यांनी पवई पोलिसांचे आभार मानत त्यांच्या या कामाचे भरभरून कौतुक केले.

यापूर्वीही ६ डिसेंबर रोजी हिरानंदानी येथून प्रवास करणाऱ्या प्रियांका साळुंखे यांची लॅपटॉपची बॅग रिक्षात विसरली होती. त्यांची तक्रार प्राप्त झाल्याच्या केवळ अर्ध्या तासातच याच टीमने शोध घेत त्यांचा लॅपटॉप त्यांना परत मिळवून दिला होता. याबाबत प्रियांका यांनी ट्वीट करत पोलिसांचे आभार मानत त्यांचा अभिमान असल्याचे म्हटले होते.

या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी एका व्यक्तीची बॅग रिक्षात विसरली होती. ज्यात महत्वाच्या सामानासोबत लग्नासाठी खरेदी केलेले दागिने देखील बॅगेत होते. पवई पोलिसांच्या याच पथकाने काही तासातच शोध घेत संपूर्ण सामानासह ती बॅग त्याच्या मूळ मालकाला परत मिळवून दिली होती.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!