@अविनाश हजारे – सर्वच समाजघटकांचा सामाजिक स्तर उंचावत असताना या प्रक्रियेत कायमच दुर्लक्षित राहिलेल्या नव्हे; ठेवल्या गेलेल्या तृतीयपंथी घटकाला समाजात सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. त्यांची समाजातील ओळख नव्याने करून देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ पवई येथे शनिवारी ‘वर्ल्ड वॉकिंग डे’चे आयोजन करण्यात आले. ‘ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल’ या संस्थेच्यावतीने हिरानंदानी गार्डन्स येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुंबईतील विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या तृतीयपंथीयांना आमंत्रित करण्यात आले होते.
तृतीय पंथीयांना समाजात नेहमीच दुर्लक्षित करण्यात आले आहे. म्हणूनच समाजातील विविध समस्या आणि रूढी परंपरांवर भाष्य करणारे चित्रपट करणारा अक्षय कुमार आज, सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी याच विषयावर बोलणारा एक चित्रपट घेवून येत आहे. सोबतच ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल या संस्थेच्यावतीने घेण्यात आलेला हा उपक्रम डोळ्यात अंजन घालण्याचे काम नक्की करेल.
माणूस म्हणून जगण्याची कथित समाजमान्यता न मिळल्याने कायमच अपमान आणि थट्टेचा विषय ठरलेले तृतीयपंथीय आता बदलत्या काळानुसार स्वतःला केवळ भिक्षा मागण्या पूरते मर्यादित न ठेवता शिक्षण घेऊन त्या मुख्य प्रवाहात येऊ लागलेत. मात्र हवा तसा सन्मान आजही त्यांना मिळत नाही ही शोकांतिकाच आहे. म्हणूनच त्यांना योग्य तो सन्मान मिळावा यासाठी येथे ‘वॉकिंग डे’चे आयोजन केले गेले असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक आणि ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल या संस्थेचे मुंबई सचिव रमेश ज्ञानतारा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुंबई किन्नर माँ संस्थेच्या खुशबू, सिने दिगदर्शक अब्दुल करीम शेख, मुंबई विद्यापीठाचे स्पोर्ट्स कॉर्डिनेटर डॉ.विजय तांदळेकर, निहाल हॉस्पिटलच्या परिचारिका उषा विश्वकर्मा, फोटोग्राफर रमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू प्रसाद आणि श्री महेश सर यांच्या उपस्थितीत असंख्य स्पर्धकांनी यात भाग घेतला.
No comments yet.