आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापेक्षा जास्त काळ रिकाम्या पड्लेल्या शाळा आज विध्यार्थ्यांच्या रूपात पुन्हा भरल्या. पवईमध्ये सुद्धा आज अनेक शाळांनी सुरुवात केली. मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवत शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुलांचे शाळेत स्वागत केले.
१ फेब्रुवारीला शाळा सुरु होण्यापूर्वी ३० आणि ३१ जानेवारीदरम्यान शाळांमधील स्वच्छता आणि इतर बाबींबाबत शाळा प्रशासनातर्फे पाहणी करून मंगळवारी शाळेची पहिली घंटा वाजली.
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर आता आजपासून राज्यात विविध ठिकाणी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तसेच काही शाळांमध्येच विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्य सरकारने शाळा आणि कॉलेज सुरु केले असले तरी अंतिम निर्णय पालकांनीच घ्यायचा आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
सुरुवातीचे काही दिवस शाळा अर्धा दिवस म्हणजे ३ तास असणार आहे. म्हणजे दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी जाऊन डबा खाऊ शकतील. किमान एक आठवडा ते १५ दिवस शाळा अर्धा दिवस सुरु राहतील. त्यानंतर आढावा घेतला जाईल आणि शाळा पूर्णवेळ सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
No comments yet.