आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक

सोशल मिडीयावर मैत्री करून आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली एका ३३ वर्षीय महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक केल्याचे नुकतेच पवईत उघडकीस आले आहे. फसवणूककर्त्याने परदेशी नागरिक असल्याची तोतयागिरी करून इंस्टाग्रामवर तिच्याशी मैत्री करत भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. गिफ्ट मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि इतर विविध शुल्क म्हणून ४.१५ लाख रुपये फसवणूककर्त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने उकळले.

५ डिसेंबर रोजी पवई पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, तक्रारदार डेटा आणि रिसर्च सर्व्हिस कंपनीमध्ये काम करतात. नोव्हेंबर २३ रोजी तिने इन्स्टाग्राम सोशल मिडीयावर डेव्हिड लुकास नामक व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. मित्र झाल्यानंतर सुरुवातीला इन्स्टाग्राम आणि त्यानंतर ते व्हॉट्सअॅप कॉलवर बोलू लागले.

“तो माणूस आंतरराष्ट्रीय नंबर वापरत असल्याने, महिलेचा असा विश्वास होता की तो परदेशातून कॉल करत आहे. एका आठवड्यानंतर, तक्रारदाराला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप कॉल आला. यावेळी डेव्हिड याने तिला सांगितले की त्याने तिला एक आयफोन आणि २०,००० पौंड रोख भेट म्हणून पाठवले आहेत,” पोलिसांनी सांगितले.

काही तासानंतर तिला अजून एका व्यक्तीने व्हॉट्सअॅप मेसेज करत तो कुरिअर सेवेवरून बोलत असून तिला आलेल्या भेटवस्तूचे कुरिअर शुल्क म्हणून २०,००० रुपये द्यावे लागतील. महिलेला ते खरे वाटले आणि तिने पैसे दिले. मात्र, त्यानंतरही तिला अधिक पैशांसाठी फोन येत राहिले.

“फसवणूक करणाऱ्याने पार्सलमध्ये २०,००० पौंड असल्याने आणखी ६८,००० रुपये मागितले होते. महिलेने ५०,००० रुपये दिले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने कर, रक्कम पौंड वरून रुपयात बदलण्यासाठी अशी विविध कारणे देत पैसे घेत राहिला. यादरम्यान त्याने महिलेला तिच्या खात्यात २० लाख रुपये पाठवल्याचे सांगत रुपये प्रोसेसिंग फी म्हणून १ लाख भरण्यास सांगितले,” असे यासंदर्भात बोलताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “वारंवार पैशांच्या होणाऱ्या मागणीला कंटाळून महिलेने डेव्हिडला फोन करून भेट नको असल्याचे सांगितले आणि पैसे परत करण्यास सांगितले. पण डेव्हिडने समजावल्याने तिने पैसे देणे चालूच ठेवत ४.१५ लाख रुपये दिले पण भेट मिळाली नाही.”

डेव्हिडने तिच्याशी संपर्क संवाद बंद केल्याचे तिला समजल्यावर तिचा संशय वाढला. पुन्हा पैशाची मागणी करणारा फोन प्राप्त होताच आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तिने पवई पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद केला आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!