लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामे बंद आहेत. अशात बाहेर पडणे शक्य नसल्याने घरातच बसून काम करण्यासाठी ऑनलाईन नोकरी शोधत असणाऱ्या तरुणीला सायबर ठगांनी फसवल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अंमलात आणलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मुंबईकरांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना पगार सुद्धा मिळालेले नाहीत. अनेकांची घरे ही महिन्याला येणाऱ्या पगाराच्या भरवशावर चालू असतात. घरबसल्या काही काम करता येईल का याच्या शोधात असे अनेक लोक आहेत. याचाच फायदा घेत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीने डाव साधायला सुरुवात केली आहे.
पवईतील फिल्टरपाडा येथे राहणारी २३ वर्षीय शलाका (बदलेले नाव) घाटकोपर येथील एका खासगी कंपनीत अॅडमिन विभागात कार्यरत आहे. लॉकडाऊननंतर तिचे ऑफिसही मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद आहे. ज्यामुळे तिला मार्च महिन्याच्या पगार सुद्धा कमी हाती पडला होता. त्यातच लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला असल्यामुळे एप्रिल महिन्यात ही पगार मिळण्याची शक्यता कमीच आहे. ३ मे नंतरही असणाऱ्या परिस्थितीवर पुढील सगळे अवलंबून असल्याने सध्याची नोकरी आणि भविष्याबद्दल अनिश्चितता होती. त्यामुळे ती घरबसल्या करता येणाऱ्या नोकरीच्या (वर्क फ्रॉम होम) शोधात होती.
वर्क फ्रॉम होमच्या नावे फसवणूक
मी कामाच्या शोधात असताना एप्रिल १६ रोजी मला सोशल मिडियामध्ये राहुल अहुजा नामक एका व्यक्तीच्या प्रोफाईलवर एक घरबसल्या कामाची संधी असणारी जाहिरात मिळून आली. मी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने मला चांगल्या मोबदल्याच्या कामाची माहिती पाठवत २ हजार रुपये नोंदणी फी म्हणून ऑनलाईन भरण्यास सांगितले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात शलाकाने म्हटले आहे.
तिने त्वरित त्याची ऑफर स्वीकारली, त्यानंतर त्याने तिला सत्यापनासाठी ६,००० रुपये आणि अंतिम पडताळणीसाठी तिला आणखी १०,००० रुपये भरण्यास सांगितले.
संपूर्ण रक्कम भरल्यानंतर ही काम मिळत नसल्याने शलाकाने पुन्हा सोशल माध्यमात जावून त्याच्याशी संपर्क सध्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला ब्लॉक केले असल्याचे तिच्या लक्षात आले.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच शलाकाने पवई पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली आहे.
“आम्ही भादवि कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्तर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. आमचा तपास सुरु आहे, मात्र या कठीण काळात लोकांनी सतर्क राहणे अति-आवश्यक आहे. अशा फसव्या लोकांपासून दूर राहून आपल्या आसपासच्या लोकांना सुद्धा याबाबत सावध केले पाहिजे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणाले.
सध्या बाहेर पडणे शक्य नसल्याने अनेक व्यवहार हे ऑनलाईनच होत आहेत अशात नागरिकांनी जास्त दक्ष असायला हवे. आपण सुरक्षित मार्गातून योग्य रक्कम आणि योग्य व्यक्तीला अदा करत आहोत का याची खात्री करून घेतली पाहिजे. सोशल माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या ऑनलाईन नोकरी किंवा इतर जाहिरातींवर डोळे झाकून विश्वास न ठेवता त्याची खातर जमा करूनच त्याबाबत आर्थिक व्यवहार करावेत. असे आवाहन सुद्धा यावेळी पोलिसांकडून करण्यात आले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.