पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. पवई येथील फुलेनगर परिसरात राहणारा हा तरुण मगरीचे पिल्लू विक्रीच्या तयारीत असताना सापळा रचून वन विभागाने त्याला ताब्यात घेतले. एक महिन्याच्या या मगरीच्या पिल्लाची लांबी ३२ सेंटीमीटर एवढी आहे.
यश पारगावकर (२१) असे तस्करी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुलूंड परिमंडळाकडून त्याच्यावर वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पवई तलाव भागात मगरींचा अधिवास आहे. या ठिकाणी मगरींचे नैसर्गिक प्रजनन देखील होते. अनेकदा येथील मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. तर कधी कधी किनाऱ्यांवरील टेकड्यांवर सूर्यप्रकाश घेण्यासाठी बसलेल्या असतात.
बुधवार, १० जुलैला एक व्यक्ती पवईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरील, आयआयटी मार्केट गेट भागात मगरीच्या पिल्लाची विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बनावट ग्राहक तयार करून या भागात वन विभागाने सापळा रचून पाळत ठेवली होती.
“पाळत ठेवलेली असताना एक तरुण संशयास्पदरित्या वावरताना दिसताच वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक मगरीचे पिल्लू वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळून आले,” असे वन विभागाने सांगितले.
मगर वन्यजीव अधिनियम १९७२ अधिसूची १मध्ये असून, मगरीच्या तस्करीप्रकरणी ३ ते ७ वर्ष कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे.
या प्रकरणी मुलूंड परिमंडळाकडून त्याच्यावर वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता वन विभागाला आरोपीची दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे. या तरुणाने हे मगरीचे पिल्लू कुठून आणले होते? याचा तपास वनविभागाकडून केला जात आहे.
ठाणे येथील वन विभागातील उप वन संरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक ठाणे सोनल वळवी, वनक्षेत्रपाल मुंबई राकेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रोहित मोहिते मानद वन्यजीव रक्षक ठाणे, वनपाल मुलुंड संदीप यमगर, वन संरक्षक भांडूप मिताली महाले आणि वन रक्षक राम केंद्रे आदी सहभागी होते.
No comments yet.