पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत असून, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्था, संघटना, शाळा महाविद्यालयातर्फे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत दहशतवादी कृत्याचा निषेध करत आहेत. पवईमध्ये सुद्धा पवईकरांनी रस्त्यावर येत एकजुटीने कॅण्डल मार्च काढून, शोकसभा, निषेध नोंदवत आणि परिसरातील दुकाने आणि बाजार बंद ठेवून शहीद जवानांना आदरांजली दिली.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी, १४ फेब्रुवारीला झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. ताफ्यात ७८ वाहनात २५४७ जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर ३५० किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला होता.
पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून भारत-पाकिस्तानमधील संबंध विकोपाला गेले आहेत. अंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या कृत्याची निंदा केली जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात याबद्दल क्रोध आहे. पवईकरांनी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच विविध माध्यमातून या भ्याड हल्ल्याबद्दल आपला निषेध व्यक्त केला.
हिरानंदानीत कॅण्डल मार्च
रविवारी पवई बेंगाली वेल्फेअर असोसेशन, पवई बिहारी असोसेशन, मुंबई लेकर्स, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, पवई आणि पवईकर यांनी संयुक्त रित्या एकत्रित येवून संपूर्ण परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात आला. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना वेरोना फौंटन येथे मेणबत्ती लावून आदरांजली दिली. शनिवारी याच मार्गावर चालत संगर्व तर्फे कॅण्डल मार्च काढून पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत आणि त्यांचा झेंडा जाळून आपला निषेध नोंदवला.
आयआयटी भागात विविध संस्थातर्फे शहिदांना श्रद्धांजली
पवई आयआयटी भागात पोलीस बीट चौकी येथे कैलाश कुशेर यांच्या विद्यमातून, सैगलवाडी येथे बाल मित्र मंडळ, गोखलेनगर येथे संजय बनसोडे, चैतन्यनगर येथे महेंद्र उघडे, रमाबाईनगर येथे रहिवाश्यांतर्फे शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. तर गणेशनगर येथील तरुणांनी पवई तलाव ते आयआयटी भागात कॅण्डल मार्च काढून पाकिस्तान विरोधात घोषणा देत आपला राग व्यक्त केला.
दुकाने, बाजार बंद
हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी पवईतील दुकानदारांनी रविवारी एकदिवस आपली दुकाने बंद ठेवली. तर सोमवारी येथील सगळे बाजार बंद ठेवण्यात येवून संध्याकाळी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येवून बाजार भागात शहिदांना आदरांजली दिली.
युटूबरची आर्थिक मदत
संपूर्ण जगभर मोटो व्लॉगर आणि लाइफस्टाइल व्लॉगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवईकर, निखील शर्मा म्हणजेच ‘मुंबाईकर निखील’ याने त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या रप सॉंग आणि १८ जानेवारीला रिलीज केलेल्या व्लोगचे संपूर्ण उत्पन्न शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments yet.