डागडुजी आणि अस्वच्छतेमुळे पाठीमागील अनेक महिन्यांपासून खितपत पडलेले आयआयटी मेनगेट जवळील सार्वजनिक शौचालय लायन्स क्लब ऑफ पवईतर्फे दत्तक घेण्यात आले आहे. येथून पुढील काळात त्याच्या डागडुजी आणि स्वच्छतेचे काम संस्था पाहणार आहे. क्लबचे अध्यक्ष कपिलदेव सिंह आणि सदस्य भवानी शंकर शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शौचालय दत्तक घेण्यात आले आहे. नुकतेच शौचालयाचे नूतनीकरण करून ते सार्वजनिक वापरासाठी उघडण्यात आले. नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, क्लब सदस्य डॉ. त्रिलोकी मिश्रा, प्रियदेव श्रीमंगलम, अशोक सिंग आणि आशुतोष श्रीवास्तव यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.
आयआयटी मेनगेटच्या परिसरातील एकमेव असणारे हे सार्वजनिक शौचालय अनेक महिने दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या अभावामुळे निरुपयोगी होते. आयआयटी बीट चौकीच्या शेजारीच असणाऱ्या या शौचालय सभोवतालच्या भागात सहसा प्रवाशी आणि इतर नागरिकांचा वावर असतो. त्यातच सार्वजनिक शौचालयाची उपलब्धता नसल्याच्या कारणास्तव मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ज्यात प्रामुख्यानं महिलांना याचा अधिक त्रास होत असतो.
सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्याने लोकांना एकतर शोध घेत आसपासच्या परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयात १०-१५ मिनिटे चालत जावे लागते.
याबाबत बोलताना लायन्स क्लबच्या सदस्यानी सांगितले की, “नागरिकांच्या या समस्येचा विचार करता नगरसेवकांच्या नेतृत्वात लायन क्लब ऑफ पवईच्या प्रयत्नातून ही समस्या सोडवण्यात आली आहे. येथून पुढील काळात याच्या डागडुजी आणि स्वच्छतेवर संस्थेचे नियंत्रण राहील.”
लायन्स क्लबने घेतलेल्या या पाऊलामुळे आता बर्याच लोकांना सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी इतर परिसरात जावे लागणार नाही आहे. केवळ स्थानिकांसाठीच नव्हे तर अभ्यागतांना सुद्धा याचा लाभ घेता येणार असल्याने गोष्टी सुलभ झाल्या आहेत.
No comments yet.