चांदिवली येथे राहणाऱ्या आणि एका नामांकित पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकारयाला भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मिळवून देण्याच्या बहाण्याने ७ लाखाला ऑनलाईन गंडविल्याची घटना नुकतीच पवईत समोर आली आहे. २१.५४ लाख रुपये त्याच्या पीएफ खात्यात जमा असून, ते मिळवण्यासाठी विविध फीच्या नावावर भामट्यांनी त्यांना ७ लाखाचा गंडा घातला आहे. १० वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. याबाबत पवई पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पीएफ विभागाकडून टेलिफोन करत असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेकडून मला अनेक फोन आले आहेत. तिने मला तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात २१.५४ हजार रुपये जमा आहेत. ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही अर्ज भरून देणे आवश्यक आहे. तुम्हाला काही रक्कम सुद्धा भरावी लागेल असे तिने सांगितले होते, असे याबाबत पोलिसांना दिलेल्या जवाबात तक्रारदार ओम प्रकाश आहुजा (६८) यांनी म्हटले आहे.
“आहुजा यांनी पहिला अर्ज भरल्यानंतर त्यांना २०,१०० रुपये जमा करण्याची विनंती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्या महिलेने पुन्हा फोन करून अजून काही कारणास्तव त्यांना २ लाख खात्यात जमा करण्यास सांगितले.” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
२८ जानेवारीला परत त्या महिलेने फोन करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून, ५ लाख रुपये भरण्यास सांगत संध्याकाळ पर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत आहुजा यांच्या खात्यात पीएफचे २१.५४ लाख जमा होतील असे त्यांना आश्वासन दिले.
“नंतर मला समजले की मी फसलो आहे आणि फसवणूक करणार्याने माझा फोन हॅक करून कॉल रेकॉर्ड सुद्धा हटविला आहे” असे आहुजा यांनी इंग्रजी दैनिकाशी बोलताना सांगितले.
खात्यात पैसे जमा झाले नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच २९ जानेवारी रोजी आहुजा यांनी पवई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
संपूर्ण निधी हा ईआरएन कंपनीच्या नोएडा येथील खात्यात वर्ग करण्यात आला आहे. “तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा ४ फेब्रुवारीला पुन्हा फोन करून त्या महिलेने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५० हजार रुपयांची मागणी केली आहे,” असे पोलिसांनी सांगितले.
No comments yet.