मि लिंदनगर म्हाडा येथील इमारतीत राहणारे एनएसजी कमांडो संदिप पानतावणे (३२) यांच्या घरात घुसून, चोरी करून त्यांची वैयक्तिक रिव्हॉल्व्हर, २० जिवंत काडतूस, ३ तोळे सोने आणि चार हजाराची रोकड लंपास करणाऱ्या दोन चोरांना पवई पोलिसांनी अटक केली आहे.
शमिम सलिम शेख (२३) आणि सादिक अक्कानी शेख (२३) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून, दोघेही त्याच परिसरात राहतात.
२६/११ आतंकी हल्यानंतर मुंबईला सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी भारताचे पाचवे एनएसजी हब पवईमध्ये बनवण्यात आले आहे. या हबमध्ये असणाऱ्या स्पेशल एक्शन ग्रुप (एसएजी) कमांडोवर मुंबईच्या विशेष सुरक्षेची जबाबदारी आहे. यापैकी एक संदिप हे आपल्या परिवारासोबत जवळच असणाऱ्या म्हाडाच्या इमारतीत राहतात.
मंगळवारी सर्व सदस्य कामानिमित्त घरातून बाहेर असताना काही चोरट्यांनी घरात घुसून त्यांची वैयक्तिक असणारी ७.६५ एमएम रिव्हॉल्व्हर, २० जिवंत काडतुसे, ३० ग्राम सोन्याचे दागिने आणि ४ हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पवई पोलीस ठाण्यात केली होती.
“आमच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ४८ तासाच्या आत आम्ही त्याच परिसरात राहणाऱ्या शमिम आणि सादिक या दोन सराईत गुन्हेगारांना या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे आणि ८ ग्राम सोने हस्तगत करण्यात आले आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.