पवईमधील दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणारे मिलिंद विद्यालयाचे संस्थापक सदानंद रावराणे सर यांना शिक्षक भारती संघटनेतर्फे ‘उत्कृष्ठ संस्था चालक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी व मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार मा. श्री. कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
रावराणे सर यांचा हा संपूर्ण प्रवास अतिशय खडतर होता. अनेक संकटांवर मात करत मिलिंद विद्यालयाला एका छोट्या रोपट्यापासून मोठ्या कल्पवृक्षापर्यंत त्यांनी वाढवले आहे. पवई आणि आरे परिसरात असणाऱ्या अनेक आदिवासी पाड्यातील मुलांनी येथून शिक्षण घेतले असून, आजही मोठ्या प्रमाणात येथील विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. आज या संस्थेतून शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्य करीत आहेत. त्यांचे हे कार्य अजूनही अविरत सुरु असून, त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेत शिक्षक भारती संघटनेतर्फे या वर्षीचा उत्कृष्ठ संस्था चालक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“हा सन्मान फक्त माझाच नाही तर या शाळेसाठी आजतागायत झटणारे माझे सहकारी, शिक्षक कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक या सर्वांचा आहे. आम्ही जे काही शाळेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करू शकलो यामध्ये यांचा मोलाचा वाटा आहे. हा पुरस्कार आम्हाला अजून जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहन देत राहील,” अशा शब्दात रावराणे सरांनी याबाबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.