आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत लग्न जुळवणाऱ्या साईटवर तरुणींशी ओळख वाढवून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या आहेत. अभिजीत परमेश्वर गाढवे (२६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथून अभिजीतला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.
साकीनाका पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची काही दिवसांपूर्वी एका मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाली होती. यावेळी त्याने आपण आयपीएस अधिकारी असून, आपले वडील हे सेनेतून निवृत्त झाल्याचे सांगितले होते. तसेच आपली सातारा येथे स्ट्रॉबेरीची शेती असल्याचे देखील सांगितल्याने फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जवळीक वाढली होती.
“आपली एअरपोर्टमध्ये चांगली ओळख असून, यानंतर मुंबई विमानतळावर कार्यरत कंपनीत ऑफिसर पदावर कामावर लावण्याच्या बहाण्याने ७३ हजार ९०० रुपये उकळले होते. तसेच आरोपीने संबंधित तरुणीला बोगस नियुक्ती पत्र आणि ओळख पत्र देखील दिले होते. मात्र हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे लक्षात येताच तरुणीने याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती”, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत साकीनाका पोलिसांनी तांत्रिक यंत्रणेसह आपल्या खबरयांचे जाळे कार्यरत केले होते. विशेष बातमीदार याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी आरोपी अभिजित गाढवे याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
भादवि कलम ४२०, ४०६, ४७१, १७० अन्वये दाखल गुन्ह्यात अटक करून साकीनाका पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने फिर्यादीसह अनेक मुलींची फसवणूक केली असल्याची कबुली दिली.
No comments yet.