साकीनाका पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपाई वैजनाथ कांबळे यांनी सिमेंट मिक्सरमध्ये अडकून पडलेल्या लालबहादूर (३५) या तरुणाला धाडसाने वाचवून जीवनदान देत मुंबई पोलिसांच्या शौर्याची प्रचिती दिली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याशी जोडल्या गेलेल्या शिपायांच्या धाडसाची ही दुसरी कहाणी आहे. या पूर्वीही अजून एक पोलीस शिपायाने आत्महत्येसाठी डोंगरावर चढलेल्या तरुणाचा जीव वाचवण्याचे धाडसी कृत्य केले होते.
बुधवारी नेहमी प्रमाणे साकीनाका पोलिसांची मोबाईल वन परिसरात गस्त घालत होती. साकीनाका जंक्शन जवळून जात असताना दुपारी दोन वाजता काही दुकानदारांनी पोलीसगाडी अडवत सिग्नलवर उभ्या असणाऱ्या एका सिमेंट मिक्सर गाडीत एक तरुण पडला असल्याचे सांगितले.
गाडीत असणारे पोलीस शिपाई कांबळे यांनी त्वरित तिकडे धाव घेत सिमेंट मिक्सरचे पाठीमागील मिक्सर बंद ठेवून गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि गाडीवर चढून मिक्सरमध्ये वाकून पाहिले असता सिमेंटमध्ये पूर्ण बुडालेल्या माणसाचे फक्त डोके आणि हात दिसत होते.
“खूप आत सिमेंटमध्ये व्यक्ती अडकलेला होता. हात देवून त्याला बाहेर काढणे आमचे पोलीस शिपाई कांबळेंना शक्य होत नव्हते. म्हणून त्यांनी मिक्सरवर चढून, आत प्रवेश करून, आपला जीव धोक्यात घालत त्याला बाहेर खेचून काढले. थोडा जरी उशीर झाला असता तर श्वास गुदमरून तरुणाचा जीव गेला असता” असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.
पोलीस शिपाई कांबळे यांनी याबाबत बोलताना सांगितले, “साकीनाका जंक्शन सिग्नलवर सिमेंट मिक्सर उभा असताना चालकाची नजर चुकवत लालबहादूर नशेत मिक्सरवर चढला. काही दुकानदारांनी त्याला आत पडलेला पाहून आम्हाला त्याची माहिती दिली. वर चढून पाहिले असता त्याचे डोके आणि हात वगळता सर्व शरीर सिमेंटमध्ये अडकलेले होते. अग्निशमन दल येवून त्याला वाचवण्याएवढा वेळ नसल्याने माझ्या सहकार्यांच्या मदतीने मी मिक्सरच्या तोंडाला धरून आत घुसून त्याला ओढून बाहेर काढले.”
“सिग्नलवर गाडी उभी असल्याने त्याचा मिक्सर फिरणे बंद होते. गाडी जर चालू अवस्थेत असती तर मिक्सरमध्ये अडकून किंवा सिमेंटमध्ये बुडून त्याचा मृत्यू अटळ होता” असेही ते पुढे म्हणाले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.