साकीनाका पोलिसांनी सापळा रचून जप्त केले ९ कोटींचे कोकेन अंमलीपदार्थ

साकीनाका परिसरात अंमलीपदार्थ विकण्यासाठी आलेल्या २ परदेशी तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून ९ कोटी रुपयाचे (८८० ग्राम) अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. साकीनाका पोलिसांच्या रात्रपाळी गस्तीवरील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. डॅनियल नायमेक (३८) जोएल अलेजांद्रो वेरा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या नायजेरियन तरुणांची नावे असून, ते दोघेही मुंबईत अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आले होते.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाका पोलीस ठाणेचे पोउनि नागरे, पोउनि परदेषी, पोशी शिगवण, पोशी कदम, पोशी कोळेकर, पोशी शेख हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना रात्री ०२.४५ वाजताचे सुमारास हंसा इंडस्ट्रीजजवळ एक परदेशी इसम संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आला.

पथक त्याच्याजवळ येत असल्याचे पाहताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस पथकाने त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडे हिंदी आणि इंग्रजी भाषेत विचारपूस केली असता तो समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील प्लास्टीक पिशवीत पिवळया रंगाचे प्लास्टीकचे आवरण असलेल्या मोठया आकाराच्या एकूण ८८ भरीव कॅप्सुल असल्याचे आढळून आले.

“आम्ही त्या कॅप्सुलमध्ये काय आहे याबाबत ताब्यात घेतलेल्या इसमाकडे कसून चौकशी केली असता त्याने नमूद कॅप्सुलमध्ये कोकेन हा अंमलीपदार्थ असल्याचे कबूल केले,” असे साकीनाका पोलिसांनी सांगितले.

यासंदर्भात कलम-८ (क) सह २१ (क) एन.डी.पी एस अॅक्ट -१९८५ सह १४ परकीय अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून इसम नामे डॅनियल नायमेक यास अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा अमंली पदार्थ हे जोएल अलेजांद्रो वेरा रामोस याच्याकडून घेतल्याचे सांगितले. नायमेक याने दिलेल्या माहितीच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी जोएल यास ड्रिम रेसीडेन्सी हॉटेल, साकीविहार रोड येथून ताब्यात घेतले.

साकीनाका पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, मुंबईमध्ये त्यांचे इतर साथीदार तसेच मुंबई शहरात अंमलीपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांबाबत अधिक तपास करत आहेत.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!