प्रेयसीचा हॉटेलमध्ये खून करणार्‍या प्रियकराला ३ तासात साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रेयसीचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला साकीनाका पोलिसांनी खबर्‍याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ३ तासात अटक केली आहे. शोएब शेख असे अटक आरोपीचे नाव आहे.

मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास साकीनाका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिकी कोरे यांना एका खबऱ्याने फोन करून त्यांच्या शेजारील एक व्यक्ती संशयास्पद वावरत असून, त्याने काहीतरी गंभीर केले असल्याचा संशय असल्याचे सांगितले.

माहितीच्या आधारे कोरे आणि पथकाने २४ वर्षीय तरुण शोएब शेख याला साकीनाका परिसरातून ताब्यात घेतले. “पोलीस चौकशी दरम्यान त्याने त्याची प्रेयसी एमी उर्फ अमित कौर (३५) हिचा नवी मुंबई येथील एका हॉटेलमध्ये खून केला असल्याची कबुली दिली,” असे साकीनाका पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “माध्यमिक इयत्तेतून शाळा सोडलेल्या आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या शेखची एका मुलीची आई आणि नवी मुंबई येथे बँकेत मॅनेजर असणाऱ्या अमित कौर हिच्याशी पाठीमागील वर्षी सप्टेंबरमध्ये सोशल मीडिया साईटवर ओळख झाली होती. काही महिने डेट केल्यावर कौर हिने लग्नाची इच्छा व्यक्त केली होती.”

सोमवारी कौर हिचा वाढदिवस असल्याने दोघे जुईनगर येथील तिच्या कार्यालयाबाहेर रात्री आठच्या सुमारास भेटले आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी नेरुळला गेले. त्यानंतर ते कोपरखैरणे येथील एका हॉटेलमध्ये रात्री थांबले होते.

कौर हिने लग्नाची मागणी केल्याने शोएब गडबडलेला होता. सोबतच त्याला तिचा दुसरा व्यक्तीशी संबंध असल्याचा देखील संशय होता. यातूनच त्याने तिचा खून केला असल्याची कबुली दिल्याची पोलिसांनी सांगितले.

यासंदर्भात साकीनाका पोलिसांनी तुर्भे पोलिस ठाणे ज्यांच्या अखत्यारीत ते हॉटेल होते त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळा आवळलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडल्याची पुष्टी केली. त्यानंतर तुर्भे पोलिसांनी शेखविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.

आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत होता. साकीनाका पोलिसांच्या तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर तत्परता दाखवत गुन्ह्याच्या अवघ्या तीन तासातच आणि खुनाचा गुन्हा दाखल होण्याआधीच आरोपीला ताब्यात घेतल्याने वेळेत गुन्हा उघडकीस आला; सोबतच आरोपीची मोठी शोधाशोध टाळता आली, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे म्हणाले.

पुढील तपासकामी शेखला नवीमुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!