मुंबईच्या साकीनाका भागातील एका व्यक्तीला आपला मोबाईल दुरुस्त करून घेणे महागात पडले आहे. साकीनाका येथे मोबाईल फोन रिपेअरिंग स्टोअरच्या कर्मचाऱ्याने त्याची २ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४० वर्षीय पीडित कदम यांनी आपला मोबाईल फोन मोबाईल रिपेअरिंग स्टोअरला दुरुस्तीसाठी दिला होता. दुरुस्तीच्या काळात मोबाईल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने फोनमधील बँकिंग अॅपमध्ये प्रवेश करत त्यांची फिक्स डिपॉजीट (एफडी) तोडली आणि पैसे आपल्या खात्यात ट्रान्सफर केले.
कदम यांना ७ ऑक्टोबरला फोनच्या स्पीकरमध्ये काही समस्या आल्यामुळे ते एका स्थानिक फोन दुरुस्तीच्या दुकानात गेले. तेथील कर्मचाऱ्याने त्यांना सिम कार्ड फोनमध्येच सोडण्यास सांगितले. ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे ८ ऑक्टोबर दुरुस्त झालेला फोन परत घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना दुकान बंद असल्याचे आढळून आले. ९ आणि १० ऑक्टोबरलाही दुकान बंद ठेवण्यात आले होते.
११ ऑक्टोबरला मोबाईल रिपेअर स्टोअर उघडण्यात आले मात्र तेथे दुसरा कर्मचारी दुकान चालवत होता. कदम यांनी त्यांचा फोन आणि सिमकार्ड मागितले, मात्र कर्मचाऱ्याने काही तरी निमित्त केले.
मला काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने एका मित्राशी संपर्क साधून सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर त्याच्या फोनमध्ये बँकिंग अॅप घेवून माझे खाते तपासले असता मला धक्काच बसला. माझी एफडी मोडली असून, २.२ लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे आढळले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात कदम यांनी म्हटले आहे.
यानंतर कदम यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, साकीनाका पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
No comments yet.