पवई तलावाला गेल्या अनेक दिवसापासून गटाराचे सांडपाणी सोडून प्रदूषित केले जात आहे. यासंदर्भात स्थानिक जनता आणि पर्यावरणवादी संस्थेने पालिकेला तक्रारी दिल्या आहेत. मात्र हे सर्व पालिकेच्या संगनमताने होत असल्याने, पालिका अधिकारी संस्थेच्या प्रतिनिधिंना भेट देण्यास टाळाटाळ करत आहेत व बेजबाबदार वक्तव्य व उडवाउडवीची उत्तरे देवून पळवाटा शोधत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा बाळगत असल्याने आता पालिका अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करणार असल्याचेही काही स्थानिकांचे म्हणणे आहे.
घाण, सांडपाणी थेट नैसर्गिक वैभव असणाऱ्या पवई तलावात सोडल्यामुळे पवई तलाव अस्वच्छ झाला आहे. तलावाच्या पाण्यात प्लास्टिक पिशव्या, घाण, बॉटल्स यांचा थर साचलेला आहे. त्यातून घाण वास येत असून, स्थानिक दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत व परिसरात आजारपण वाढलेले आहे. याबाबत स्थानिक व पर्यावरणवादी संस्थांनी पुढे येत पालिकेसह, मुख्यमंत्री व केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र याबाबत प्रशासनाला जाग येत नसून, त्यांनी बिनबुडाची आणि टाळाटाळ करणारी उत्तरे देणे सुरु केले असल्याचे स्थानिकांचे आणि पर्यावरणवादी संस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत बोलताना पॉज मुंबई संस्थेचे सुनिश सुब्रामनियम यांनी सांगितले, “पालिकेने सुरुवातीला तलाव भागानजीक असणारी मलनिसारण वाहिनी फुटली आहे, ‘कंत्राटदार मिळताच दुरुस्तीचे काम करू’ असे सांगितले होते, मात्र त्याला आता महिना उलटून गेला आहे तरी परिस्थिती जैसे थी आहे. या समस्येला घेऊन आम्ही पालिका सहाय्यक आयुक्त ‘एस’ विभाग यांना भेटून परिस्थिती सांगण्यासाठी वेळ मागितली होती. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता अधिकारी भेटणार असल्याची माहिती त्यांचे सहाय्यक पंकज भोईर यांनी फोन करून आम्हास दिली. (संभाषणाचे रेकॉर्डिंग आवर्तन पवईकडे आहे) मात्र प्रत्यक्षात जेव्हा आम्ही सोमवारी संध्याकाळी त्यांना भेटण्यास गेलो तेव्हा त्यांनी भेटण्यास टाळाटाळ केली. उशिरा पर्यंत आम्ही त्यांना भेटण्यासाठी वाट पाहिली, मात्र प्रत्येक वेळी आम्हास एक वेगळेच उत्तर मिळत होते. यावरून हे पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असून, ते या प्रकरणात टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट होत आहे.”
“पवई तलावाच्या परिसरातील गृहसंकुलांचे सांडपाणी विनाप्रक्रिया तलावात सोडण्यात येते आहे. या इमारतींवर कारवाई करण्यात यावी असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविणार असल्याचे बेजबाबदार वक्तव्य याबाबत प्रतिक्रिया देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी केले आहे. मात्र इमारत बांधणीपासून मलनिसारण वाहिनीपर्यंतच्या सर्व अनुमत्या पालिकाच देत असते. मग इतके दिवस या इमारती जर विनाप्रक्रियाच सांडपाणी सोडत होत्या, तेव्हा पालिका काय करीत होती?” असा संतप्त सवाल युथ पॉवर संस्थेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र धिवार यांनी उपस्थित केला आहे.
वारंवार तक्रारी करून सुद्धा पालिका याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत असल्यामुळे बुधवारी काही स्थानिक आणि पर्यावरणवादी संस्थेनी एकत्रित चर्चा करून टाळाटाळ करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.