पवईतील हिरानंदानी, जलवायू विहार भागात अवजड वाहनांना बंदी असतानाही, अवैधरित्या चालणारी डंपर वाहतूक, अवैध पार्किंग आणि हॉकर्स विरोधात पवईमध्ये बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जलवायू विहार चौकात पार पडले. यावेळी आमदार लांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) रमेश नागरे, साकीनाका वाहतूक विभागाचे सपोनि संभाजी मोहिते, शिवसेना शाखाप्रमुख सचिन मदने, शाखा संघटिका सुषमा आंब्रे, वैशाली सूर्यवंशी (संपर्क प्रमुख पिंपरी-चिंचवड), उपशाखा प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पवईतील जलवायू विहार भागात मोठ्या प्रमाणात नागरिक अवैधरित्या पार्किंग करत असल्याच्या तक्रारी या परिसरात राहणारे नागरिक सतत करत होते. तसेच या भागातून मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक सुद्धा होत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत होता. अनेकदा इमारतीत प्रवेश करत असताना किंवा बाहेर पडत असताना भरधाव धावणाऱ्या डंपरसमोर आल्याचा प्रसंग सुद्धा घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यातच पाठीमागील काही महिन्यात या भागात अवैध फेरीवाले सुद्धा वाढले असल्याची तक्रार स्थानिकांना संबंधित विभागांना केली होती. मात्र त्यावर काहीच ठोस पाऊले उचलली गेली नव्हती.
“सध्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने थोडा दिलासा आहे. शाळा सुरु असताना शालेय बसेस, शालेय खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्या या संपूर्ण भागात दुतर्फा पार्क केल्या गेल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या परिसरात सतत होत होती. या संदर्भात सर्व संबंधित विभागांना तक्रारी करूनही त्यांनी कानाडोळा केला आहे,” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
“परिसरातील या समस्यांबाबत नागरिकांनी आम्हाला तक्रारी केल्यावर आम्ही सुद्धा संबंधित विभागांना कडक कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतीची हालचाल दिसत नसल्यामुळे अखेर आज आम्ही आंदोलनचे माध्यम निवडले आहे. यामुळे का होईना प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे, असे याबाबत बोलताना सचिन मदने यांनी सांगितले.
“आम्ही कायमच डंपरचालक आणि अवजड वाहनांवर कारवाई करत असतो,” असे याबाबत बोलताना साकीनाका वाहतूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
डंपरवर कडक कारवाई
रमेश नागरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) यांनी यावेळी आंदोलकांशी बोलताना सांगितले की, “आम्ही आजपासून अशा डंपरवर कडक कारवाई सुरु करत आहोत. येणाऱ्या काळात ही समस्या परिसरातून पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
येथे रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या फेरीवाल्यांना बाजूलाच असणाऱ्या आणि आठवडा बाजार लागणाऱ्या पालिकेच्या जागेत गाडी लावण्याची अनुमती दिल्यास पालिकेला उत्पन्न मिळेल, फेरीवाल्यांना हक्काची जागा आणि नागरिकांना खरेदीसाठी हक्काचे ठिकाण. यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांचा प्रश्नही मिटेल, असेही यावेळी बोलताना काही नागरिकांनी सांगितले.
No comments yet.