साकिनाका परिसरातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याचा तपास करणाऱ्या साकीनाका पोलिसांनी अथक प्रयत्न करत अवघ्या तीन तासांमध्ये त्याला शोधून काढत आईवडिलांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याच्या उकलीमुळे केवळ अपहरणाच्या गुन्ह्याचाच उलघडा झाला नसून, त्याच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाचे पितळ सुद्धा उघडे पडले आहे.
साकिनाका येथील हॉलिडे इन हॉटेल जवळ असणाऱ्या सत्यानगर पाईप लाईन जवळील वाडीत राहणारा सहा वर्षीय अयान निसार चौधरी आपल्या परिसरात खेळत होता. दुपारी तीन वाजता जेव्हा त्याची आई त्याला शोधत आली, तेव्हा तो तेथे मिळून आला नाही. बरेच शोधूनही तो न सापडल्याने त्याच्या आई-वडिलांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.
“तपासात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला एक महिला अयानला घेऊन जात असल्याचे आढळून आले. मुलाच्या आईवडिलांना ते फुटेज दाखवले असता त्यांनी महिलेला ओळखून ती एकेकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुप्रिया शिंदे सारखी दिसत असल्याचे सांगितले”, असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्माधिकारी यांनी म्हणाले.
“महिलेची ओळख पटताच आम्ही सुप्रिया राहत असलेल्या जरीमरी परिसरात जावून तिला ताब्यात घेतले. तिच्याजवळ केलेल्या चौकशीत तिने मुलाचे अपहरण केले असल्याचे कबूल करत मुलाचे वडील चौधरी यांचे तिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. रविवारी सकाळी दोघांच्यात भांडण झाल्याने चौधरी यांना धडा शिकविण्यासाठी रस्त्यावर खेळणाऱ्या अयानचे तिने अपहरण केले असल्याचे सांगितले”, असे एका तपासी अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.
साकीनाका पोलिसांनी सुप्रियाला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करून कोर्टात सादर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.