पवई परिसरातील डोंगराळ भागात आज २२ एप्रिल २०२० एक चितळ मृतावस्थेत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयआयटी पवईला लागून असणाऱ्या फुलेनगर जवळील डोंगर भागातील महाकाली मंदिरापाठीमागे हे चितळ मृतावस्थेत मिळून आले. चितळाची वैद्यकीय तपासणी केली असता उंचावरून पडून चितळाचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे.
या संदर्भात मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅंट अन्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाऊंडेशनच्या (एसीएफ) हेल्पलाइन नंबरवर सकाळी साडेसात वाजता एक फोन आला. यावेळी एका नागरिकाने आयआयटी मुंबई जवळील डोंगराळ भागात असणाऱ्या एका मंदिराच्या बाजूला एक चितळ मृतावस्थेत पडल्याची माहिती दिली.
“स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. वन क्षेत्रपाल (प्रादेशिक) मुंबई संतोष कंक यांना माहिती देत त्यांच्या पथकासह आम्ही घटनास्थळी पोहचलो. पवईतील फुलेनगर जवळील डोंगर भागातील महाकाली मंदिरापाठीमागे एक चितळ मृतावस्थेत पडलेले आम्हाला मिळून आले. सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगाराम कुसाळे, पोलीस शिपाई अशोक सोमनाथ डोंबाळे व महिला पोलीस नाईक सविता काळे सुद्धा पोहचले.” असे कुंजू यांनी सांगितले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवून आम्ही चितळाला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे घेवून गेलो. राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव पशुवैद्यक डॉ. शैलेश पेठे यांनी त्याची तपासणी (शवविच्छेदन) करून, उंचावरून पडून चितळाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले असल्याचे याबाबत बोलताना सुनिष कुंजू यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “अंदाजे ३ ते ४ वर्षाचे असणारे ते नर चितळ होते. चारा आणि पाण्याच्या शोधात ते या डोंगर भागात पोहचले असावे. याचवेळी डोंगरावर फिरत असताना घसरून पडून त्याचा मृत्यू झाला असावा. तसेही चितळ नाजूक आणि भित्रा प्राणी आहे. रात्री शांत असणाऱ्या परिसरात आता लॉकडाऊनमुळे जास्तच शांतता आहे त्यामुळे एखादा छोटासा आवाज सुद्धा त्यांना घाबरवण्यास पुरेसा आहे.”
सदर ठिकाणी मानद वन्यजीव रक्षक मुंबई शहर सुनीष सुब्रमण्यम कुंजू, वनरक्षक पंकज कुंभार व शिघ्र बचाव दलचे कर्मचारी संतोष भांगणे हे उपस्थित होते.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.