ईमेल हॅकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन घोटाळेबाजांनी पवई पोलिसांच्या अखत्यारीतील एका फार्मासिटिकल कंपनीला ४५ लाखाला गंडवले आहे. थेट दुसर्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून, कंपनीचे मेल खाते हॅक करून त्यातील सगळे पुराव्यांचे मेल डिलीट करून कोणताही मागमूस न ठेवता मोठ्या सफाईने हे काम करण्यात आले आहे. कंपनीच्या वरिष्ठ संचालकानी यासंदर्भात अज्ञात आरोपींविरोधात ६३.४३५ डॉलर्सच्या (जवळपास ४५ लाख रुपये) फसवणुकीचा पवई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवणारी कंपनी असल्याचे भासवत, कच्च्या मालाच्या दोन कन्साईन्ट्मेंट पाठवण्याच्या बहाण्याने भामट्यांनी ही रक्कम लांबवली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील एका फार्मा कंपनीने चीनमधील ताईसिंग प्रिसिसेस टेक कंपनी लि. या कंपनीकडून कच्चा माल खरेदी केला आहे. त्यांच्याकडून वस्तू खरेदी करण्यासाठी केमिकल_चाईना@हॉटमेल.कॉमवर ([email protected]) ह्या इमेल आयडीवर तक्रारदार यांचे सगळे व्यवहार सुरु होते.
५ ऑगस्ट रोजी तक्रारदारास केमिकल_चाईना@हॉटमेल.कॉमवरकडून एक मेल प्राप्त झाला होता. ज्यात चीनमधून हवाई आणि समुद्री मार्गाने पाठवलेल्या कच्च्या मालाचे दोन “विक्री करार” होते. तक्रारदार यांनी त्याला मान्यता देत मेलमध्ये नमूद केलेल्या बँक तपशिलावर व्यवहाराचे पैसे पाठवून दिले. नंतर मेलमध्ये दिलेले बँकेचे तपशील हे चीनचे नसून नेदरलँडचे असल्याचे समोर आले. याबाबत स्पष्टीकरण मागितले असता समोरील व्यक्तीने बँकेचे तपशील बरोबर असल्याची माहिती दिली.
भारतीय कंपनीने पाठवण्यात आलेल्या दोन कन्साईन्ट्मेंटचा मोबदला म्हणून ६३.४३५ डॉलर्स (जवळपास ४५ लाख रुपये) दिले होते. उरलेले पेमेंट करण्यासाठी तक्रारदार यांनी चिनी कंपनीकडे संपर्क साधून बिलाची मागणी केली. मात्र वेगवेगळ्या करणातून होणारी चालढकल पाहता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी तातडीने आपल्या बँकेला पेमेंट थांबविण्याचे निर्देश दिले.
“तक्रारदार यांनी याबाबत व्यवहाराचे झालेले मेल पाहण्यासाठी आपले मेल खाते उघडले असता चीनी कंपनीसोबत झालेल्या सर्व चर्चेचे मेल डिलीट करण्यात आले असल्याचे आढळले,” असे याबाबत बोलताना पोलिस अधिकारयाने सांगितले.
यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलमांसह, माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
No comments yet.