कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना केलेल्या असतानाच मुंबईतील कोरोना पॉजिटिव्ह किंवा संशयित मिळून आलेल्या १४६ इमारती/भागांना पालिकेतर्फे प्रतिबंधित करण्यात आले आहे. या उपाययोजने अंतर्गत पालिका ‘एस’ विभागांतर्गत येणारी पवईतील दोन ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. या भागांना पालिकेने सुरक्षित करत मुंबई पोलिसांची सुरक्षा सुद्धा ठेवण्यात आली आहे. सूचना देणारे बॅनर्स या भागात लावण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून, आज, १ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे. एकट्या मुंबईत १८१ पॉजिटीव्ह रुग्ण मिळून आले आहेत. राज्यात आज कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ३० रुग्ण हे केवळ मुंबईचे आहेत, तर पुणे येथील २ आणि बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज राज्यात करोनामुळे ३ मृत्यूंची नोंद झाली. यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय पुरुष आहे तर दुसरा ५१ वर्षीय पुरुष आहे. याशिवाय ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू पालघर येथे झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत.
या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत एक दिलासादायक बाब ही आहे की आत्तापर्यंत राज्यातील ४१ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईतील या वाढत्या बाधितांच्या संख्येला पाहता बृहनमुंबई महानगरपालिकेने अजून ठोस पाऊले उचलत ज्या भागात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण किंवा संशयित मिळून आले आहेत अशा भागांना सिल केले आहे. यानुसार पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या मेन स्ट्रीटवरील काला खंबा (रोडास सर्कल) ते ऑर्चीड एव्हेन्यू जंक्शन भागाला प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच आयआयटी पवई येथील साईनाथनगर भागातील गल्लीला सुद्धा सुरक्षित करण्यात आले आहे. या भागातील रहिवाशांना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून, बाहेरील नागरिकांना या भागात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. अशा आशयाचे फलक पालिका आणि पोलिसांच्यावतीने येथील प्रवेशांवर लावण्यात आले आहेत.
“या भागात पॉजिटिव्ह आणि संशयित मिळून आल्याने उपाययोजना म्हणून हे भाग सुरक्षित करण्यात आले आहेत,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
सुरक्षित करण्यात आलेल्या हिरानंदानीतील एका सोसायटीने आपल्या रहिवाशांना याबाबत संदेश पाठवून इमारतीचे दोन्ही गेट पालिकेतर्फे बंद करण्यात आले असून, दूध, ब्रेड आणि दैनंदिन वापरातील सामान गेटवर येणार आहे, तिथूनच सोशल डिस्टंन्सिंग राखत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच या संदेशात मेडिकल इमर्जन्सीसाठी एक चावी देण्यात आली असून, त्याप्रसंगी एक गेट उघडले जाईल असेही सांगण्यात आले आहे.
पवईतील दोन ठिकाणे प्रतिबंधित केली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केलेल्या या उपाययोजना केवळ त्या भागासाठी नसून, संपूर्ण परिसरासाठी आहेत त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा पालिकेच्यावतीने याबाबत बोलताना करण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.