तुंगा परिसरातून हरवलेल्या लहान मुलीचा सापडला मृतदेह

डावीकडे: घटनास्थळ, उजवीकडे: मृतदेह पोलीस वाहनातून रुग्णालयात घेवून जाताना

तुं गा परिसरातून गायब झालेल्या श्रीया अजय मेश्राम, हिचा मृतदेह आज (बुधवारी) दुपारी १ वाजता तुंगा परिसरातील कृष्णा बिजनेस पार्क भागातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या टाकीत आढळून आला आहे. रविवार रात्री ११ पासून तुंगागाव, साकीविहार रोड परिसरातून श्रीया गायब होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आला असून, पोलिसांनी अपहरण, बलात्कार, हत्या व पोस्का अशा विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरु केला आहे.

कामानिमित्त आईवडील सोलापूरला राहत असल्याने, आजी-आजोबा आणि आत्यासोबत पवईतील साकिविहार रोडवरील तुंगागाव मुरली चाळीत राहणारी श्रीया रविवार रात्री साडेनऊ वाजता जेवल्यानंतर घरासमोरच खेळण्यासाठी गेली होती. रात्री अकरा वाजता तिची आत्या आणि आजोबा शोधत बाहेर आले असता त्यांना ती कुठेच दिसली नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर सुद्धा ती कुठेच सापडत नसल्याने अखेर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती.

पोलीस पथकासह स्थानिक नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. अखेर अपहरणाचा गुन्हा नोंद करत पवई पोलीस आणि गुन्हे शाखेने स्वतंत्र तपास सुरु केला होता.

रेल्वेस्थानके, छोटेखानी हॉटेल्स सोबतच तुंगागाव व पवई परिसरातील गटारे, पाण्याच्या टाक्या निर्जनस्थळे पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत पालथी घातली जात होती. बुधवारी सकाळी शोधमोहीम सुरु असताना, पोलीस पथकाला साकीविहार रोडवरील एमटीएनएल ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या कृष्णा बिजनेस पार्क परिसरातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या चेंबरमध्ये एका मुलीचा मृतदेह असल्याचे आढळून आले. याबाबत पवई पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह काढून, शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात घेऊन पाठवला असताना श्रीयाच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली आहे.

rasta roko

स्थानिकांचा रास्तारोको

“याच परिसरातील एक लहान मुलगी ६ तारखेच्या रात्रीपासून गायब होती. साधारण त्याच वर्णनाच्या मुलीचा मृतदेह आढळून आलेला आहे. शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात मृतदेह घेऊन जाण्यात आलेला आहे. तेथून मिळणाऱ्या अहवालावरच मुलीचा मृत्यू कसा झाला आहे हे स्पष्ट होऊ शकेल.” असे आवर्तन पवईशी बोलताना पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी सांगितले

याबाबत बोलताना पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी नाव न-जाहीर होण्याच्या अटीवर सांगितले “मृतदेह हा विवस्त्र अवस्थेत आढळून आला असून, कपडे हे बाजूच्या झाडीत सापडले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालावरच पुढील सगळे स्पष्ट होऊ शकते. मात्र अपहरण, बलात्कार, हत्या व पोस्का अंतर्गत गुन्हा नोंद करून आम्ही तपास सुरु केला असून, गुन्हेगार लवकरच ताब्यात असेल.

मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती परिसरात पसरताच हजारोच्या संख्येने स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी  केली होती. मुलीचे अपहरण करून तिला मारून टाकणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. या मागणीसाठी स्थानिकांकडून काही काळ वाहतूक जाम करून टाकण्यात आली होती, मात्र पवई पोलीस व राखीव दलाच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवत दोषीवर कारवाईचे आश्वासन मिळताच स्थानिकांनी रस्ता मोकळा करून दिला. मात्र रात्री ९ वाजता पुन्हा स्थानिकांनी पवई पोलीस स्थानकात कॅण्डल मार्च काढून आरोपीस लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

  

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!