३२ एक्टिवा, ६ कारसह सराईत गुन्हेगाराला पवईत अटक

पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल

परिमंडळ १० पोलीस उपायुक्त विनायक देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त साकिनाका विभाग समद शेख, तपासी अधिकारी मुजावर आणि टिम हस्तगत केलेल्या गाड्यांसोबत

अटक आरोपी नासीर सद्दान खान (४८)

वई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. खान कैलाश कॉम्प्लेक्स, पार्कसाईट येथील रहिवाशी असून तो रोडवर मॅकॅनिकचे काम करतो. पवई पोलीस सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे अधिक तपास करत असून, तो अजून ही काही गुन्ह्यांची उकल करण्याची शक्यता आहे.

हस्तगत करण्यात आलेल्या ३२ एक्टिवा आणि ६ कार

पवई पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही महिन्यात दुचाकी गाड्या चोरीच्या गुन्ह्यांनी हादरवून सोडले आहे. केवळ हिरानंदानी भागातून गेल्या पाच ते सहा महिन्यात २२ गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत; तर पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास ४० गाड्यांच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यात एक्टिवा गाडीला चोरांकडून प्राधान्य देण्यात आले होते. या वाढत्या गुन्हेगारीच्या मुसक्या वेळेत आवळण्यासाठी, पवई पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी पोउनि समीर मुजावर व टिमचे एक खास पथक तयार करून तपास सुरु करण्यात आला होता. ज्यामध्ये सफलता मिळत त्यांनी खान याला अटक केली आहे.

याबाबत तपासी अधिकारी पोलिस उप-निरीक्षक समीर मुजावर यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले, “या गुन्ह्याला रोखण्याची जबाबदारी आम्हाला मिळताच आम्ही गुन्ह्याची पध्दती, वेळ आणि काही विशेष बाबींचा बारकाईने अभ्यास केला. तपास चालू असताना सुप्रीम बिझनेस पार्क येथील एका दुचाकीच्या चोरीचे सीसीटीव्ही फूटेज आम्हाला मिळाले होते. आरोपीचा पुसटसा चेहरा आम्हाला मिळून आला होता, तो फोनवर बोलताना ही समोर आले होते. ज्यावरून त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या मोबाईलची माहिती मागवून प्रत्येक माहिती व्यवस्थित पडताळली जात होती. या काळातच आमच्या एका खबऱ्याने आम्ही दिलेल्या वर्णनाचा व्यक्ती पार्कसाईट हद्दीत टिंबकटू हॉटेलजवळ राहत असून, तो काळ्या रंगाची स्कुटी वापरत असल्याची माहिती दिली. त्या व्यक्तीचे नाव आम्हाला मिळालेल्या फोन माहितीत सुद्धा आढळून आल्यावर, आम्ही वेषांतर करून सतत चार दिवस अदलून-बदलून त्याच्या हालचालीवर पाळत ठेवली आणि चोरीच्या गाडीसह त्यास अटक केली.”

“जशी मागणी तसा पुरवठा या तत्वावर तो गाड्यांची चोरी करत होता. काही चोरीच्या गाड्यांचे पार्टस काढून तो दुरुस्तीला आलेल्या गाडींशी बदलत असे. मॅकॅनिक असल्याने त्याच्यावर कोणाला शंका सुद्धा येत नसे. आम्ही हस्तगत केलेल्या गाड्यांपैकी काही नवीन गाड्यां चेसीज नंबर खराब करून थोड्या दिवसात कागद बनवून देतो म्हणून विकल्या होत्या, तर काही गाड्या नातेवाईकांना वापरास दिलेल्या होत्या” असे सहाय्यक पोलीस आयुक्त समद शेख यांनी आवर्तन पवईला सांगितले.

खान हा नेहमी दिवसा एका ठराविक वेळेतच आपला डाव साधत असे. एक्टिवा गाडीचे समोरील हेडलाईट खालील भागात असणाऱ्या दोन वायर एकमेकांशी जोडून, गाडी डायरेक्ट करून, केवळ ३ मिनिटांत आपले काम करून तो पळून जात असे.

“आम्ही आतापर्यंत ३२ एक्टिवा आणि ६ कार हस्तगत केलेल्या आहेत. ज्यापैकी २१ गाड्या या पवई हद्दीतल्या आहेत. चोरीची वाहने त्याने विविध ठिकाणी लपवून ठेवलेली होती. एका कारला त्याने टक्सीत बदलून विकलेले होते. त्याच्याकडून अजूनही काही गाड्या हस्तगत होण्याची शक्यता आहे, त्या दिशेने आमचा तपास चालू आहे” असे परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक समीर मुजावर, पो.ह. कुंभार, पो.ह. भोसले, पो.ना. देसाई, पो.ना. जगताप, पो.शि. मुसळे, पो.शि. बांदकर, पो.शि. शेख यांनी मुंबईतील या सर्वात मोठ्या गुन्ह्याचा तपास आणि उकल केलेली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!