डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान उदघाटनाच्या प्रतीक्षेत

रविराज शिंदे
ambedkar gardenवई तलाव आणि परिसर हे मुंबईकरांच्या पर्यटन स्थळाच्या यादीतील महत्वाचे ठिकाण आहे. या भागात सौंदर्यीकरण प्रकल्प राबवल्यापासून हा भाग मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला असतानाच, पवईतील एल-अँड-टी समोरील २२ एकर जागेवर विस्तारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मात्र अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी १७ कोटीं रुपयांचा खर्च पालिकेतर्फे करण्यात आला असून, या उद्यानाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या उद्यानातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळाही उभारला जाणार आहे, मात्र तो पर्यंत किमान हे उद्यान जनतेसाठी खुले करण्याची मागणी स्थानिक आणि पर्यटक करत आहेत.

पवई तलावानजीक असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी एल-अँड-टी समोरील २२ एकर जागेवर असणाऱ्या जुण्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था झाली होती. त्या उद्यानाचे पवई तलाव आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

२०१३ मध्ये या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी २१ कोटी २१ लाख १८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात १७ कोटी २३ लाख ७२ हजार रुपयांचा निधी खर्च करून, लॅंडमार्क को. ऑ. लि. कंपनीमार्फत हे काम करण्यात आले आहे. परंतु अद्यापही काम अपूर्णच असल्याच कारण देत पालिकेतर्फे उद्यानाचे नाम फलकही कपड्याने झाकून ठेवण्यात आले आहे. स्थानिक दुसऱ्या मार्गाने या उद्यानात प्रवेश करत असले तरी एल-अँड-टी समोरील उद्यानाचे प्रमुख गेट बंद असल्याने येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांना उद्यानात जाता येत नाही.

परिसरात वसलेल्या वसाहतींमध्ये मोठया प्रमाणात राहत असणाऱ्या आंबेडकर प्रेमींची मागणी पाहता मुंबई महानगर पालिकेने या उद्यानाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले आहे, मात्र बाबासाहेबांच्या नावाचा फलक झाकून ठेवल्याने आंबेडकरी प्रेमींमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

“सदर उद्यानात १६६५ चौरस मीटर राखीव जागेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. ज्याच्या देखभालीची जबाबदारी पवई तलाव सेवा समितीला देण्यात आली आहे. मात्र अद्याप पुतळा उभारणीसाठी महापालिकेकडून पाऊले उचलली जात नाही आहेत. परिणामी आंबेडकरी समूहात असणाऱ्या असंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो” असे आवर्तन पवईशी बोलताना समितीचे अध्यक्ष प्रकाश बिऱ्हाडे यांनी सांगितले.

“१४ एप्रिल २०१६ रोजी देशभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होणार असल्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. तेव्हा याच दिवशी या उद्यानाचे उदघाटन करावे, अन्यथा त्या दिवशी समितीच्यावतीने उद्यानाच्या फलकावर लावलेले कापड हटवून उद्यानाचे उदघाटन करून ते जनतेसाठी खुले केले जाईल” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!