पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद

पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच पवई आणि चांदिवलीत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवार, २३ मार्चला एकाच दिवसात पवई आणि चांदिवली परिसरात मिळून ४९ नव्या बाधितांची नोंद पालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभरातील या परिसरातील कोरोना बाधितांची ही सर्वांत मोठी वाढ आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांमध्ये इमारत भागात राहणाऱ्या रहिवाशांची संख्या जास्त असून, चाळ सदृश्य वस्त्यांमध्ये मंगळवारी झालेली नोंद ही कमी आहे.

मुंबईत कोरोना बाधितांचा मंदावलेल्या वेगाने पुन्हा उसळी मारली आहे. मुंबईमध्ये मंगळवारी कोरोना विषाणूच्या ३५१२ बाधितांची नोंद झाली. तर ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच शहरातील एकूण संक्रमितांची संख्या ३,६९,४२६ व मृत्यूंची संख्या ११,६०० झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये १२०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर २७६७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


पवई आणि चांदिवलीमध्ये मंगळवारी कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठला. विशेष म्हणजे मागील वर्षी या परिसरात २८ मे २०२०ला एकाच दिवसात सर्वाधिक १६ बाधितांची नोंद झाली होती. मात्र मंगळावर, २३ मार्च २०२१ रोजी बाधितांच्या संख्येचा तो उच्चांक मोडत ४९ बाधितांची नोंद पालिका आरोग्य विभागाकडे झाली आहे.

एकाच दिवसात ४९ कोरोना बाधितांची नोंद

मंगळवार, २३ मार्चला नोंद झालेल्या बाधितांमध्ये हिरानंदानी गार्डन्समध्ये ८ बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये ७ पुरुष तर १ महिलेचा समावेश आहे. तर लेकहोम कॉम्प्लेक्समध्ये ९ बाधितांची नोंद झाली. ज्यात ५ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे. पंच श्रीष्टी कॉम्प्लेक्समध्ये याच दिवशी ६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, यात ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. रहेजा विहार येथे ३४ वर्षीय पुरुष आणि २३ वर्षीय महिला तर रामबाग म्हाडा येथे ३१ वर्षीय पुरुष आणि ४१ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.

तसेच एस एम शेट्टी शाळेजवळील पवई म्हाडा भागात एक ७५ वर्षीय पुरुष आणि ७२ वर्षीय महिला तर पवई विहारमध्ये एका बाधिताची नोंद झाली आहे. एमटीएनएल स्टाफ कॉलनीत राहणाऱ्या २ पुरुषांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. एनटीपीसी कॉलनीतील ६० वर्षीय महिला तर साकीविहार रोड येथे इमारतीत राहणारे २ पुरुष आणि एक महिला बाधित असल्याचे समोर आले आहे. त्रिकुटा इमारतमधील ३५ वर्षीय महिला आणि तुंगागावमधील २४ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

सोबतच चांदिवली म्हाडा येथे एक २१ वर्षीय पुरुष; नहार अम्रित शक्ती, चांदिवली येथील ९ वर्षीय मुलगी; नीटी कंपाऊंड येथील ४४ वर्षीय पुरुष; टाटा पॉवर कॉलनीमध्ये राहणारी ६४ वर्षीय महिला आणि आयआयटी मेनगेट समोरील इमारत भागात राहणारी एका ६७ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याची नोंद झाली आहे.
आयआयटी मार्केट समोरील चाळसदृश्य वस्तीत राहणारा ७० वर्षीय पुरुष; सैगलवाडी येथील ८३ वर्षीय पुरुष आणि तिरंदाज व्हिलेजमधील २ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आयआयटी बॉम्बे परिसरात राहणारे एक महिला आणि एक पुरुष सुद्धा कोरोना बाधित असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच पवई आणि चांदिवली परिसरात झालेली ही वाढ चिंता वाढवणारी ठरत आहे. पालिकेकडून योग्य ती खबरदारी घेवून आणि सुरक्षिततेविषयी जनजागृती करून सुद्धा कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्याचे मोठे आव्हान पालिका आरोग्य विभाग आणि नागरिक या दोघांवर सुद्धा असणार आहे.

विशेष सूचना: बातमीत देण्यात आलेला बाधितांचा आकडा हा २३ मार्च रोजीच्या पालिकेच्या यादीतून घेण्यात आलेला आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!