एसएम शेट्टी शाळेजवळ चालणाऱ्या रोड-गटरच्या कामामुळे नागरिक त्रस्त; योग्य उपाययोजना करण्याचे नगरसेवकांचे आश्वासन

रस्त्यावर पडलेले मातीचे ढिगारे

एसएमशेट्टी शाळेजवळील भागात सांडपाणी वाहून नेण्यासाठी गेल्या महिनाभरापासून गटरनिर्मितीचे काम सुरु आहे. मात्र या कामासाठी खोदकामानंतर निघालेली माती आणि मलबा तसाच रोडवर पडून असल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. सोबतच येथील म्हाडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींत घरांमध्ये धूळ-माती उडून नागरिकांच्या घरात मैदान सदृश्य परस्थिती निर्माण झाल्याची तक्रार येथील स्थानिक करत आहेत. नगरसेवकांनी याबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबईच्या अनेक भागात पालिकाअंतर्गत येणाऱ्या मुलभूत सुविधाच्या पावसाळापूर्व कामांनी वेग घेतला आहे. पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागात रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची सोय नसल्यामुळे, गटारे तुंबल्यामुळे, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मुंबईकरांना संपूर्ण पावसाळा डबक्यातच काढावा लागतो. पवईतील प्रभाग क्रमांक १२२ अंतर्गत सुद्धा पालिका, सेन्ट्रल एजेन्सीतर्फे ठिकठिकाणी गटारे, रस्ते निर्मितीची कामे सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून एसएमशेट्टी शाळेजवळील भागात सुद्धा रस्ता आणि गटर निर्मितीचे काम सेन्ट्रल एजेन्सीतर्फे करण्यात येत आहे. मात्र या कामाचा मलबा रस्त्यात पडून राहिल्याने आणि योग्य ती खबरदारी घेतली गेली नसल्यामुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.

‘गेल्या महिनाभरापासून येथे गटर निर्मितीचे काम सुरु आहे. यासाठी खोदकाम केलेला मलबा हा कंत्राटदाराने रोडवरच टाकला असल्याने आधीच निमुळत्या असणाऱ्या या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी शाळेच्या वेळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात भर म्हणून येथे रस्त्यांवर पडलेल्या मातीतून वाहने जाताना धुरळा, धूळ, माती उडून आसपास असणाऱ्या इमारतीतील घरांमध्ये जात आहे. यामुळे अनेक घरात मातीचे मैदानात असावे असे चित्र पहावयास मिळत आहे’ असे याबाबत बोलताना स्थानिक बाबा (दिपक) गायकवाड यांनी सांगितले.

एस एम शेट्टी शाळेजवळ सुरु असणारे काम

‘एवढ्यावरच त्रास थांबला नसून, चालू असणाऱ्या कामाच्या येथे सिमेंट कॉन्क्रेट टाकण्यासाठी रात्री-अपरात्री गाड्या येथे येत असतात. यावेळी जोर जोरात आवाज झाल्याने जवळच असणाऱ्या म्हाडा २५ नंबरमध्ये राहणाऱ्या अनेक रहिवाशांची झोपमोड होत असते’ असेही याबाबत बोलताना येथील स्थानिक नागरिक शिंदे यांनी सांगितले.

या संदर्भात आवर्तन पवईने कंत्राटदार यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क बनू शकलेला नाही.

या संदर्भात कामाच्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि सीसी गटाराचे कामाचे कंत्राट मिळाले असून, सध्या गटर निर्मितीचे काम सुरु आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येथील काम सुरु राहणार असून, पावसाळयानंतर पुन्हा उरलेल्या कामाची सुरुवात करण्यात येईल. पुढील पावसाळ्यापूर्वी काम संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संदर्भात स्थानिक नगसेविका वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ‘मला स्थानिकांच्या तक्रारी मिळाल्या आहेत. मी सेन्ट्रल एजेन्सीशी संपर्क साधून त्यांना रस्त्यावर पडलेला मलाबा त्वरित उचलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामाच्या वेळी स्थानिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतही सूचना दिल्या आहेत’ असे आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

रस्त्यावर पडलेले मातीचे ढिगारे आणि निर्माण झालेली वाहतूक कोंडी

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!