पवई तलावात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला

पवई तलावात शनिवारी मासेमारी करत असताना एका ४० वर्षीय आदिवासी व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. व्यक्तीच्या पायाला मगरीने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. विजय काकवे असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या परिसरात पालिकेतर्फे तशा सूचना देणारे फलक ही लावण्यात आले आहेत. मासेमारी किंवा इतर कारणासाठी तलावात जावू नये अशा सूचनाही या फलकांवर देण्यात आल्या आहेत. मात्र या परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यातील अनेक लोकांची मासेमारीवरच उपजिविका होत असते. त्यामुळे त्यांच्याकडे इतर कोणताच पर्याय नसल्याने जीवावर उदार होत ते मासेमारी करत असतात.

पवईतील पेरुबाग परिसरात राहणारे विजय काकवे हे सुद्धा मासेमारी करून आपली उपजिविका करत असतात. शनिवार, २६ जूनला दुपारी १ वाजता ते असेच मासेमारी करण्यासाठी पवई तलाव भागात गेले होते. त्याचवेळी अचानक एका मगरीने त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाच्या पंजाला चावा घेत त्यांना पाण्यात खेचले.

“मी हातपाय मारत बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र मगर मला पाण्यात खेचत होती. शेवटी जोर लावून कसाबसा मी पाण्यातून बाहेर पडलो,” असे यासंदर्भात बोलताना काकवे म्हणाले.

परिसरातील नागरिकांना ही माहिती मिळताच त्यांनी त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

“या काळात मगरी पवई तलावाशेजारी असलेल्या मातीतील भागात आपली अंडी घालतात. तलावाच्या पलीकडे रेनेसान्स हॉटेलच्या बाजूच्या भागात, आयआयटी कॅम्पसजवळील भागात आणि गणेशनगर गणेशविसर्जन घाटाजवळील भागत मगरींची अशी अनेक अंडी घालण्याची ठिकाणे आहेत,” असे यासंदर्भात बोलताना निसर्ग प्रेमींनी सांगितले.

“रेनेसान्स हॉटेलच्या बाजूच्या भागात सायकल ट्रकचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याच भागात मगरींची अंडी घालण्याची ठिकाणे आहेत. ती या कामात उध्वस्त झाल्याची शक्यता आहे. तसेच अनेक पिकनिकर्स, पार्ट्या यामुळे तलावातील जलजीवांना याचा त्रास होतो. मगरींच्या उपस्थितीमुळे लोकांना तलावाजवळ जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी पालिका आणि वन अधिकाऱ्यांना तलावाभोवती चेतावणी देणारे अधिक फलक लावण्याची मागणी आम्ही केली आहे,” असे यासंदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्ते तबरेज अली सय्यद यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले मी स्वत: काकवे यांना राजावाडी रुग्णालयात जावून भेटून आलो आहे. त्यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. मी डॉक्टरांना त्यांना योग्य उपचार देण्याची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला सायकल ट्रॅकच्या उद्देशासाठी केलेले बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. पवई तलावाच्या काठावर बांधलेला रॅम्प तोडल्यास मगरीचा हा हल्ला टाळता आला असता.

पवई तलावात मगरींचा हा पहिला हल्ला नसून, यापूर्वीही बरेच हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक मच्छीमार जखमी देखील झाले आहेत. पवईतील तिरंदाज व्हिलेज भागात राहणाऱ्या विजय भुरे याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाठीमागील काही वर्षात हे हल्ले थांबले होते मात्र आता पुन्हा मगरीने हल्ला केल्याने वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने तलावात मासेमारीसाठी सीमारेषा आखून द्याव्यात. त्या सीमारेषाना कुंपण तयार करावे अशी मागणी आता स्थानिक करत आहेत.

यापूर्गवी मगरीच्या हल्ल्याचे शिकार: डावीकडून – बाबू भुरे यांचा फोटो दाखवताना परिवार सदस्य, मगरीच्या हल्ल्यात आपले प्राण गमावलेला विजय भुरे व मगरीच्या हल्ल्यात पायाचा चावा घेतल्याने पायाची चाळण होऊन गंभीर जखमी झालेला शंकर पवार.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!