हिरानंदानीत हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग

हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावरून निघणारे आगीचे लोळ

हिरानंदानी येथील एव्हीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर लागलेल्या आगीला आठवडा उलटला नसेल की, येथील हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर डक्टजवळ, कॅफेच्या भागाला आग लागल्याची घटना आज सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई अग्निशमन दल आणि हिरानंदानी एसटीएफ यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, येथील बोट कॅफेच्या एसीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.

या संदर्भात प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास हायको मॉलच्या लेवल एकवरून (पहिला मजला) धूर निघत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनात आले. त्यांनी त्वरित मुंबई अग्निशमन दल आणि हिरानंदानी एसटीएफला याबाबत माहिती दिली.

आगीत जाळून खाक झालेला भाग आणि आग वीजवण्यासाठी सुरु असणारे प्रयत्न

‘मॉलच्या पहिल्या मजल्यावरून काही मिनिटच आगीचे लोळच्या लोळ निघताना दिसत होते. संपूर्ण भागात धुराचे साम्राज्य पसरले होते. ज्यामुळे आग नक्की कुठे लागली आहे हेच लक्षात येत नव्हते’ असे याबाबत बोलताना काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

‘अग्निशमन दल आणि स्थानिक सुरक्षारक्षक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र धुरामुळे आगीची नक्की जागा लक्षात येत नसल्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यास अवघड जात होते. असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

‘आगीवर नियंत्रण मिळवत असताना विक्रोळी अग्निशमन केंद्राचे कर्मचारी देवेंद्र कोरडकर खाली पडून जखमी झाले आहेत’ असेही त्यांनी पुढे सांगितले.

‘आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र कॅफेच्या आतमध्ये साठलेल्या धुरामुळे आतील परिस्थिती अजून अस्पष्ट आहे. काचा फोडून धुराला जायला वाट मोकळी झाल्यानंतरच आतील परिस्थितीचा अंदाज लागेल. तूर्तास कॅफेच्या आतमध्ये असणाऱ्या एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे.’ असे याबाबत बोलताना अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes