पूर्व वैमनस्यातून पवईत एकाचा खून

प्रातिनिधिक छायाचित्र

मोबाईल चोरीच्या वादाचे कारण पुढे करत पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना काल (शनिवार) रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास पवईत घडली. विनोद पाल उर्फ काली असे मृत तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात शैलेंद्र उर्फ नन्नु यादव आणि रघू राजभर यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि पाल याचा एकेकाळचा मित्र अमित चौहान याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अमित आणि पाल यांच्यात मोबाईल चोरीवरून वाद सुरु होते. पाल याच्या एका मित्राचा फोन अमित याने चोरी केल्याचा त्याच्यावर आरोप होता. शनिवारी संध्याकाळी अमित पवई परिसरात फिरत असल्याची माहिती पालला त्याच्या मित्रांनी दिली होती. आयआयटी येथे ट्रिनीटी इमारतीजवळ अमित आणि पाल समोरासमोर येताच अमितकडे पालने मित्राच्या फोनची मागणी केली, मात्र त्यांच्यात यावरून वाद निर्माण होत मारामारीला सुरुवात होताच अमितने तिथून पळ काढला.

“आम्हाला एक तरुण पवई हॉस्पिटलजवळ गोंधळ घालत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. आमची मोबाईल व्हॅन तिथे पोहचली तेव्हा एक जखमी तरुण गोंधळ घालत होता. त्याला त्याच्या भावाच्या मदतीने गाडीत बसवून आम्ही कन्नमवार नगर येथील रुग्णालयात दाखल केले.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

आयआयटी भागात दोन गटात मारामारी चालू असल्याची माहिती पवई पोलिसांना मुख्य नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली होती. “पोलीस पथक तिथे पोहचले तेव्हा एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, त्याला राजावाडी रुग्णालयात घेवून गेले असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली,” असे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “रुग्णालयातून आम्हाला त्या तरुणाचे नाव विनोद पाल असून, त्याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.”

“एकेकाळी एकत्रित काम करणाऱ्या अमित आणि पाल यांच्यात पाठीमागील काही दिवसात वाद निर्माण झाले होते. दोघांच्या गटात नियमितपणे मारामारीच्या घटना घडत. शनिवारी सकाळपासून या दोन गटात मारामारी सुरु होती. या वादातूनच संध्याकाळी दोघे समोरा-समोर आले तेव्हा दोघांच्यात मारामारी सुरु झाली. या भांडणातच दोघांनीही एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले होते” असेही पोलिसांनी सांगितले.

“आम्ही या गुन्ह्यात शैलेंद्र उर्फ नन्नु यादव आणि एक अल्पवयीन आरोपी राजभर याला अटक केली आहे,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

यातील मुख्य आरोपी अमित चौहान हा उपचारासाठी एका रुग्णालयात येणार असल्याची माहिती मिळताच पवई पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३२६, ३२४, १४३, १४७, १४९, १०९ सह ३४ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. राजभर आणि शैलेंद्र यादव यांना रविवारी सकाळी अटक करून कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

“अटक आरोपी अमित चौहान आणि मृतक विनोद पाल दोघेही मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मारामारी, चोरी, धमकावणे असे अनेक गुन्ह्यांची दोघांच्याही नावावर नोंद आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पवई तलाव भागात तरुणावर झालेल्या हल्ल्यात सुद्धा अमित हा पोलिसांना पाहिजे आरोपी आहे,” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

पवई पोलीस या गुन्ह्यात अजून दोन तरुणांकडे चौकशी करत असून, पाहिजे आरोपींचा शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , ,

One Response to पूर्व वैमनस्यातून पवईत एकाचा खून

  1. Vipin vishwakarma July 22, 2019 at 7:16 pm #

    Please update more news . I like this website.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!