फुलेनगर कोरोना मुक्तीच्या दिशेने, ८५% बाधित बरे होऊन घरी परतले

फुलेनगर कोरोना मुक्तीच्या दिशेनेपवईसह मुंबईत कोरोना बाधितांचा ‘रेड झोन’ म्हणून ओळखले जाणारे पवईतील आयआयटी मार्केटजवळ असणारा महात्मा ज्योतिबा फुलेनगर परिसर आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वी मिळालेल्या बाधितांपैकी ८५% बाधित कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत.

पवईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची नोंद होत असतानाच, पाठीमागील १० दिवसात फक्त ५ बाधितांची नोंद आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर येथे झाली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळू लागल्याने येथे राबवण्यात आलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्याचे याच्यातून सिद्ध होत असून, नागरिकांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

मुंबईभोवती कोरोना विषाणूंचा विळखा वाढत असल्याचे शासकीय आकड्यातून स्पष्ट होत आहे. या विषाणूने पालिका ‘एस’ आणि ‘एल’ विभागात येणाऱ्या पवई परिसराला सुद्धा आपल्या कवेत घेतले असून, २५ मे पर्यंत येथे २४२ बाधितांची नोंद झाली आहे. मात्र दुसरीकडे येथील रुग्णांचा कोरोनामुक्त होण्याचा वेग सुद्धा वाढला असून, पालिकेच्या आकडेवारीनुसार ४०% पेक्षा अधिक बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनामुक्त होणाऱ्या परिसरात पवईतील अनेक परिसरांनी बाजी मारली आहे. मात्र कोरोना बाधितांचा रेड झोन म्हणून ओळखल्या जाणारया आयआयटी मार्केट जवळील फुलेनगरने कमाल केली आहे. पालिकेच्या यादीनुसार येथे मिळून आलेल्या ४४ बाधितांपैकी ३४ बाधित हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ८ बाधित हे विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. दुर्दैवाने येथील ५७ वर्षीय पुरुष आणि ५९ वर्षीय महिला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते दोघेही इतर आजारामुळे सुद्धा आजारी होते.

या परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली असल्याची १८ एप्रिल रोजी माहिती समोर आली होती. तरुणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने तिथे तिला लागण झाल्याची शक्यता पालिकेने वर्तवली होती. एप्रिल महिना संपता संपता यात अजून ५ बाधितांची वाढ झाली होती. यानंतर ३ मे रोजी ६ बाधित तर ९ मे रोजी १४ बाधितांची यात मोठी भर पडली होती. येथे भरवण्यात आलेले फिव्हर क्लिनिक आणि कोरोना चाचणी शिबीर यामुळे बाधितांची ही मोठी संख्या पुढे आली होती.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

पुढील काळात बाधित मिळण्याचा वेग वाढू नये म्हणून स्थानिक नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी येथील भागात काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. “हा संपूर्ण परिसर मोठी लोकवस्ती असणारा आहे. घरात शौचालय नसल्याने अनेक लोकांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागत होता. छोट्या छोट्या घरात मोठी कुटुंबे राहत होती. जे पाहता आम्ही बाधित मिळत असणाऱ्या परिसरातील लोकांना आणि ज्यांना लक्षणे जाणवत असतील अशा लोकांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवले.” असे याबाबत बोलताना पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

बाधित मिळत असणारे परिसर सिल करतानाच येथील नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि या काळात कशी काळजी घ्यावी याबाबत सांगण्यात आले होते. बाहेर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डीस्टन्सिंग पाळले जावे म्हणून ठोस पाऊले उचलण्यात आली होती, असे येथील काही नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले.

“येथील मिळणाऱ्या बाधितांची संख्या आता हळूहळू घटत आहे. मिळणारे बाधित एकतर अलगीकरणात आहेत किंवा दुसऱ्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जात आहेत.” असेही याबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना मुक्तीच्या उंबऱ्यावर असणाऱ्या या परिसराने आनंद व्यक्त करतानाच घेतलेल्या खबरदाऱ्या आणि उपाययोजना यांना पुढील काळात सुद्धा पाळणे तेवढेच आवश्यक आहे. तेव्हाच परिसर कोरोनामुक्त ठेवण्यात यश प्राप्त होईल, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(सर्व आकडे पालिका, पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्याजवळील नोंदीतून घेण्यात आले आहेत)

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!