पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग; डॉ. सूर्यवंशींकडे नेतृत्व

पाठीमागील अनेक वर्षांपासून साकीनाका वाहतूक विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई परिसराला आता स्वतःचा स्वतंत्र वाहतूक विभाग मिळाला आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई विभागाला डिसेंबर २००२ला स्वतंत्र करत पवई पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती आणि आता २०२२च्या सुरुवातीला पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग देण्यात आला आहे.

पवई वाहतूक विभागाचे प्रमुख पद पोलीस निरीक्षक डॉ. उत्तम सूर्यवंशी यांना देण्यात आले असून, नवनियुक्त आणि जुन्या अशा ४७ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बळावर पवई पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणारा परिसर पवई वाहतूक विभागाला नियंत्रणाची जबाबदारी असणार आहे.

पाठीमागील अडीच दशकात पवईचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. आंब्याच्या बागा, जंगल आणि त्यातून जाणारा एक छोटासा रस्ता ते मुंबईच्या प्रमुख ठिकाणांमधील एक बनले आहे. कुर्ला कमानी, असल्फा, एमआयडीसी, आयआयटी मार्केट असा दूरवर पसरलेला खूप मोठा परिसर सांभाळत असताना साकीनाका वाहतूक विभागावर वाढता दबाव पाहता पवईला स्वतंत्र वाहतूक विभागाची गरज भासू लागली होती.

अखेर पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग मिळाला असून, पवई पोलीस ठाण्याची हद्द म्हणजेच मरोळ मिलिटरी रोड, साकीविहार रस्त्याचा काही भाग, जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर सिप्झ गेट ते आयआयटी मार्केट, फिल्टरपाडा, चांदिवली फार्म रोड पवई वाहतूक विभागाच्या अंतर्गत असणार आहे. ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४७ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर या परिसरात वाहतूक कोंडी रोखणे, वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्याची जबाबदारी असणार आहे.

“पवई वाहतूक विभागाच्या अखत्यारीत येणारा परिसर हा शांत परिसर आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर वाहतूक कोंडी रोखणे आमची प्रमुख जबाबदारी असणार आहे. जेवीएलआरवर मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतूकीस अडथळा असला तरी या मार्गावर वाहतूक कोंडी रोखण्यास आम्ही यशस्वी होत आहोत,” असे यासंदर्भात बोलताना पवई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ सूर्यवंशी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “रस्त्यावर वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक असते हे पाहता आम्ही पवईतील विविध महाविद्यालये आणि शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवत आहोत. तसेच आम्ही पवईतील विविध परिसरातील नागरिकांचा आणि जनप्रतिनिधींचा एक व्हाटस एप ग्रुप बनवला आहे जिथे लोक आपल्या परिसरातील समस्या आमच्या सोबत शेअर करत आहेत. शिवाय आम्ही वेळोवेळी विविध परिसरात जावून नागरिकांशी थेट संपर्क साधत त्या परिसरात असणारी वाहतुकीची समस्या समजून घेवून त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामुळे परिसरातील ९०% पेक्षा अधिक लोक नियम पाळताना दिसत आहेत.”

पवई वाहतूक विभागाच्या निर्मितीच्या पहिल्या काही महिन्याच्या कालावधीतच पवई खटारा मुक्त करण्यात आला आहे. रस्त्यावर आणि विविध परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या १७३ पेक्षा अधिक गाड्या हटवण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर विना हेल्मेट, विना सीटबेल्ट, रॉंग साईडने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना विविध माध्यमातून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!