पवई खून प्रकरण: दोन आरोपींना हत्यारासह पवईतून अटक; गुन्हे शाखेची कारवाई

पवई खून प्रकरण: दोन आरोपींना हत्यारासह पवईतून अटक; गुन्हे शाखेची कारवाईपवई येथील ४० वर्षीय राजेश भारद्वाज याचा खून करून पसार झालेल्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल फोन, सीम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले आहे. नूर युनुस खान (वय २२ वर्ष) आणि सलीम आरिफ खान (वय २१ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिनांक २३ फेब्रुवारी रोजी पवई पोलीस ठाणे हद्दीतील विहार तलावाच्या बंधाऱ्याजवळच्या परिसरात तुंगागाव येथील रहिवाशी राजेश हरीकरण भारद्वाज (वय ४० वर्ष) यास अज्ञात इसमांनी तीक्ष्ण हत्याराने गळयावर व पोटावर गंभीर जखमा करून जीवे ठार मारले असल्याबाबत (खून) गुन्हा नोंद करण्यात आला होता.

राजेश हा त्या परिसरात फळ-भाजीचा व्यवसाय करत होता. त्यास दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी सुद्धा तो नशेत तलावाच्या दिशेने चालत जाताना सीसीटीव्ही  फुटेजमध्ये आढळून आले होते. मात्र गुन्हयाचे घटनास्थळ हे निर्जन असल्याने आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती.

पवई पोलिसांसोबतच कक्ष-१० गुन्हे प्रकटीकरण शाखा पोलीस पथक समांतर तपास करत होते. याबाबत परिसरातील काही संशयितांकडे चौकशी केली असता, सशस्त्र दरोड्यात दोन तरुणांचा सहभाग असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. “पथकाने सापळा रचून पेरुबाग परिसरातून नुर युनुस खान याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने आपला एक साथीदार सलीम आरिफ खान याच्यासह हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली,” असे याबाबत पोलिसांनी सांगितले.

गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवून सलीमला आरे कॉलनी परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपितांकडून मयत इसमाचा जबरी चोरी केलेला मोबाईल फोन, सिमकार्ड व खून करण्यासाठी त्यांनी वापरलेला धारदार चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

अभिलेखावरील गुन्हेगार

“आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. आरोपी क्रमांक १ याला सन २०१८मध्ये पवई पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्हयात अटक केली होती. शिक्षा भोगत असताना मा. न्यायालयाने कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर अटी व शर्तीवर त्याला जामीन मंजूर केला होता,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “मयत इसमाकडील रोख रक्कम व मोबाईल फोन, मौल्यवान वस्तू जबरी चोरी करण्याच्या उद्देशाला त्याने विरोध करताच आरोपींनी त्याचे मानेवर व पोटात धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला. त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल घेवून ते प्रसार झाले होते.”

सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस सहआयुक्त (गुन्हे) श्री. मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. विरेश प्रभू, मा. पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण-१) गुन्हे शाखा, श्री. अकबर पठाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम अति.कार्य.) गुन्हे शाखा श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष-१० गुप्रशा, मरोळ येथील प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, पोलीस निरीक्षक सागर शिवलकर, सपोनि सांडभोर, तोडकर, चौधरी, शेख, सपोनि पठाण, पोउनि प्रविण मेंढापुरे, स.फौ. रविंद्र माने तसेच पोलीस अंमलदार चंद्रकात गवेकर, सतिष कांबळे, प्रदीप गवंडे, जगदीश धारगळकर, रमेश नलावडे, सुनिल रोकडे, मधुसुदन चवरे, संतोश वंजारी, अजित पाटील, पवन शिंदे, मनोज नार्वेकर, सचिन ठोंबरे, हर्षवर्धन मस्के, दिग्विजय पानसरे, अविनाश चिकणे, कल्याण बाबर, प्रमोद कांबळे, रामकिसन मोरे, विकास अडसरे, मपोशि खाडे यांनी पार पाडली.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!