सराईत मोटारसायकल, मोबाईल चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रातिनिधिक छायाचित्र

पवई आणि आसपासच्या परिसरात मोटारसायकल आणि मोबाईल फोन चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमित मिठ्ठूलाल चौहान (२०) उर्फ बल्ली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनी त्याच्याकडून एक मोटारसायकल आणि एक महागडा फोन हस्तगत केला आहे.

पवई पोलीस परिसरातील मोटारसायकल आणि मोबाईल चोरीचा तपास करत असतानाच, पवईतील मिलिंदनगर येथून एक मोटारसायकल चोरी केल्याची तक्रार या वर्षाच्या सुरुवातीला प्राप्त झाली होती. “मोटारसायकल चोरून घेवून जातानाचे फुटेज आम्हाला मिळून आले होते. ज्यात आरोपी दिसून येत होता,” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी प्रवीण महामुनी यांनी सांगितले.

फुटेज तपासत असताना फुटेजमध्ये दिसणारा तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर येत होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे कार्यरत करत त्याच्यावर पाळत ठेवली होती. “पवईतील आयआयटी मार्केट भागात तो येणार असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली होती. परिसरात सापळा रचून बसलेलो असताना पोलिसांची चाहूल लागल्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मोठ्या शिताफीने आम्ही त्याला अटक केली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

भादवि कलम ३७९ आणि ३८० नुसार अमितला अटक करण्यात आली असून, चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली एक डीओ स्कूटर आणि वन प्लस-७-टी मोबाईल हस्तगत केला आहे. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याने अशाप्रकारे अजून काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!