नॅशनल मास्टर स्पर्धेत एअर रायफल शूटिंग खेळात पवईकराला गोल्ड

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या पवईतील राजेंद्र जाधव यांनी नॅशनल मास्टर स्पर्धेत एअर रायफल शूटिंग खेळात गोल्ड मिळवत पवईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यानंतर टोकीओ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील त्यांची निवड झाली आहे. केरळ (ञिवेद्रम) येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या नॅशनल मास्टर स्पर्धेमध्ये १०मिटर एअर रायफल शूटिंग (पीप साईट) या खेळात राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवत त्यांनी भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होते.

विविध राज्यातील ४०० पेक्षा अधिक स्पर्धक येथील विविध स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी रायफल शुटींगच्या ४० स्पर्धकांमध्ये झालेल्या स्पर्धेत जाधव यांनी अचूक नेमबाजी करत स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते या स्पर्धेत सहभागी १०२ वर्षाची सहभागी महिला स्पर्धक.

पवईतील पंचकुटीर भागात राहणारे राजेंद्र जाधव हे विविध सांघिक व वैयक्तिक खेळात असतात. रायफल शुटींग खेळात त्यांना अधिक रस असल्याने ते घाटकोपर येथील चम्पिअन्स शुटींग रेज येथे पाठीमागील ३ महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत.

“माझा सराव सुरु असतानाच मला केरळ येथे होणाऱ्या नॅशनल मास्टर स्पर्धेबाबत माहिती मिळाली. प्रशिक्षकांनी माझ्यावर विश्वास दर्शवत मला यात सहभागी होण्याचे प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत १० मिटर एअर रायफल शूटिंग पीप साईट (peep sight) स्पर्धेत मी सहभाग घेत जे यश संपादन केले ते मला प्रेरणा देणारे आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मला भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळेल याचा मला अभिमान आहे,” असे यावेळी बोलताना जाधव म्हणाले.

जाधव यांच्या या यशानंतर कोणताही छंद किंवा आवड जोपासायला वयाचे कसलेच बंधन नसते हे सुद्धा या निमित्ताने समोर आले आहे. समाज आणि कुटुंबाच्या आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून आपले छंद आपल्या आवडीनिवडी जपत त्यांनी हे यश संपादन करत अनेकांसमोर एक जिवंत उदाहरण ठेवले आहे. मूळचे पुणे जिल्ह्यातील सासवडचे असणारे राजेंद्र जाधव यांनी काही वर्षापूर्वी कामानिमित्ताने मुंबई गाठली. आपल्या व्यवसायात नावलौकिक कमावल्यानंतर ते सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. समाजातील गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार देण्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. एवढ्यावरच ते थांबले नाही त्यांनी आपल्या अंगातील विविध कला गुणांच्या जोरावर रायफल शूटिंग या प्रकारात सहभाग घेत नॅशनल मास्टर स्पर्धेत गोल्ड मेडल कमावले आहे.

जाधव यांना मिळालेल्या यशाबद्दल केवळ पवईकर नव्हे तर संपूर्ण भारतातून त्यांचे कौतुक होत आहे. त्याच बरोबर टोकीओ येथे होणा-या भारतीय नेमबाज संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन सुद्धा केले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!