सीएसआर निधीतून गौतमनगरच्या शौचालयाची दुरुस्ती

पाठीमागील २ वर्षापासून खस्ता अवस्थेत असणाऱ्या गौतमनगर येथील शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष कैलास कुशेर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. रोटरी क्लब ऑफ पवई यांच्या मदतीतून मिळालेल्या ६ लाखाच्या सीएसआर निधीमधून या शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

४ फेब्रुवारी रोजी रोटरी क्लब ऑफ पवईचे सहकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला.

पवईतील मोठी लोकवस्ती असणाऱ्या गौतमनगर भागातील एकमेव २ माळ्याचे सार्वजनिक शौचालय गेल्या अनेक वर्षापासून खस्ता अवस्थेत आहे. शौचालयाच्या दुरावस्थेसोबतच येथील पाईपलाईन सुद्धा आता दुरुस्तीच्या कक्षेच्या बाहेर गेली होती. २००९ साली स्टार मित्र मंडळाला याची देखभाल सोपवण्यात आली होती. मंडळातर्फे पालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करत होते.

कोणताच लोकप्रतिनिधी यात लक्ष घालत नसल्याने अखेर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष कैलास कुशेर यांनी कागदी पूर्तता आणि पाठपुरावा करत सीएसआर अंतर्गत निधी मिळवत या शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

“गौतमनगरमधील शौचालय हे फार बिकट अवस्थेत आहे, ते लवकरात लवकर दुरुस्ती करून मिळावे म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवक आमदार यांच्याकडे तक्रार करून पाठपुरावा करत होतो. मात्र कोणीही या समस्येकडे लक्ष दिले नाही. शेवटी आम्ही माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब यांच्याशी संपर्क करून सीएसआर अंतर्गत निधी मिळावा याकरीता मागणी केली होती. सतत पाठपुराव्याचे फलित म्हणून सहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे,” असे याबाबत बोलताना कुशेर यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!