बाईक स्टंट करणाऱ्या सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सरला पवई पोलिसांचा दणका; परवाना निलंबित, बाईक जप्त

पवई पोलिसांनी जप्त केलेली अरमान खान याची मोटारसायकल

बाईकवरून स्टंट करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका २१ वर्षीय सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सर तरुणाला पवई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची विनापरवाना मोडीफाईड मोटारसायकल जप्त केली आहे. एवढ्यावरतीच न थांबता त्याचा मोटारसायकल चालवण्याच्या परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुन्हा असे कृत्य घडू नये म्हणून त्याच्याकडून बॉंड सुद्धा भरून घेण्यात आला आहे.

पवईतील हिरानंदानी भागात बाईकवरून स्टंट करताना इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर पोस्ट करण्यात आलेला एक व्हायरल व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या समोर आल्यानंतर आपल्या एका साथीदारासोबत स्टंट केल्याबद्दल स्वतःचा जीव आणि आपल्या कृत्यातून रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा जीव धोक्यात टाकल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

“अरमान खान (२१) असे या तरुणाचे नाव आहे. बाईक स्टंट करून सोशल माध्यमात टाकलेल्या या व्हिडीओच्या मदतीने तो कमाई करत असून, हाच त्याच्या जीवनाचा आणि उत्पन्नाचे माध्यम असल्याचा दावा त्याने केला आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या दरम्यान ऑक्टोबरमध्ये पवईतील हिरानंदानी परिसरात एका स्ट्रीटवर हा बाईक स्टंट करताना व्हिडीओ रेकॉर्ड केला गेला होता. हा व्हिडीओ पोलिसांच्या समोर येताच १० ऑगस्ट रोजी पवई पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याला घाटकोपर येथील नित्यानंद नगर परिसरातून अटक करण्यात आली. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनवणे यांनी तरुणाच्या अटकेची पुष्टी केली.

“व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मोटारसायकलचा नंबर हा दिसून येत नव्हता. आम्ही मुंबईतील इतर पोलीस ठाण्यात व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मोटारसायकलबद्दल काही माहिती किंवा गुन्हा नोंद आहे का? याबाबत माहिती मागवली होती. विक्रोळी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा एक गुन्हा व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मोटारसायकल मालकावर जानेवारी महिन्यात नोंद असल्याची माहिती आम्हाला मिळाली,” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांनी सांगितले.

“विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यात त्याची जामिनावर सुटका झाली होती. अशा प्रकारचे कृत्य पुन्हा न करण्याची चेतावणी देऊन मोटारसायकल त्याला परत करण्यात आली होती. तथापि, त्याने आपली कृती थांबवली नाही आणि कमाईसाठी स्टंट करत राहिला,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “अटक करण्यासोबतच आपली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली असून, त्याच्यावर मोठी कारवाई होत असल्याची माहिती पडल्यावर तो पोलीस ठाण्यात ओक्साबोक्सी रडला. मात्र प्रतिबंधात्मक कारवाई करत त्याच्याकडून असे कृत्य पुन्हा न करण्याचे आणि केल्यास कडक कारवाईचा बॉंड घेण्यात आला आहे.

खानवर आयपीसी कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ३३६ (इतरांचे जीवन आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारी कृती) आणि मोटर वाहन कायदा कलम १२९ / १७७ (कायद्याचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणांमध्ये सध्या अशा प्रकारे स्टंट करून त्याचे व्हिडीओ सोशल माध्यमात टाकण्याचे क्रेझ आहे. मात्र असे कृत्य करणे मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तरुणांनी अशी कृत्ये रस्त्यांवर करू नयेत अन्यथा त्यांना सुद्धा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!