बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम

एस एम शेट्टी शाळेजवळ सिल्वर ओक ते जलवायू विहार रस्त्यावर उभ्या असणाऱ्या शाळेच्या बसेस

एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा प्रश्न आता पवईकरांना सतावत आहे.

दोन महिने मोकळा श्वास घेणाऱ्या पवईच्या रस्त्यांचा शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला की श्वास गुदमरायला सुरुवात होते. येथील रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था दिवसभर पवईकर अनुभवत असतात. शाळांच्या बाहेर उभ्या शाळेच्या बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्या यांनी रस्ता व्यापून टाकल्याने विविध कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना यातून मार्ग काढत जाणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. या वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे इतर शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचा अर्धवेळ शाळा ही या वाहतूक कोंडीतच भरत असते.

हिरानंदानी हॉस्पिटलसमोर पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी समूहाच्या प्री-प्रायमरी स्कूलच्या बसेसनी रस्ता व्यापल्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी.

जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्याच्या निर्मितीमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली गेली आहेत. दररोज या मार्गावरून लाखो मुंबईकर प्रवास करत असतात यामुळे यामार्गावर वाहतूक कोंडी वाढलेली आहे. सध्या या मार्गावर मेट्रो- ६ प्रकल्पाचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडलेली आहे. त्यामुळे घाटकोपरकडे जाणारी अनेक वाहने ही हिरानंदानी मार्गे विक्रोळीवरून घाटकोपरला जाणे पसंत करतात. हिरानंदानीकडून चांदिवलीकडे येणा-जाणारी वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता हिरानंदानीतील रस्त्यांवर सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. अशा आधीच वाढलेल्या वाहतूक कोंडीत भर घालायचे काम करतायत येथील रस्त्यांच्या कडेला लांबच लांब रांगेत उभ्या असणाऱ्या एसएमशेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूलच्या शालेय बसेस, खाजगी वाहने आणि मुलांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांच्या गाड्या.

पवईत अनेक शाळा, महाविदयालये ही उपरस्त्यांवर किंवा दोन परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर आहेत. यामुळेच शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस या रस्त्यांवर विद्यार्थ्यांना घेवून आलेल्या बसेस आणि पालकांच्या गाड्यांची गर्दी असते. त्यातूनच कसाबसा मार्ग काढत सामान्य वाहतूक चालू असते. मात्र या शालेय बसेस शाळेच्या समोर लांबचलांब रांगा लावून विद्यार्थी चढे-उतरे पर्यंत तशीच रस्त्यात उभी असल्याने संपूर्ण परिसरात इतर वाहने अडकून पडून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. हे केवळ एक दिवस किंवा एक महिन्याचे राहिले नसून आता ही समस्या प्रत्येक वर्षाची कहाणी होऊन बसली असून, दिवसेंदिवस अधिकच त्रासदायक बनत चालली आहे.

या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस, पवई पोलीस, ट्राफिक वॉर्डन आणि मुंबईकर रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणाचा आटोकाट प्रयत्न करत असतात, मात्र जसजसा सूर्य वर चढत जातो तसतशी वाहतूक कोंडी वाढत जाते.

“शाळा सुटल्यावर पालक आपल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी वाहने घेऊन येतात आणि शाळेच्या समोरील फुटपाथ आणि रस्त्यावर सर्रासपणे ती वाहने उभी करतात. सोबतच रिक्षावाले सुद्धा यावेळेत येथे येवून भाड्याच्या शोधात उभी राहतात. थोडे सामाजिक भान आणि जबाबदारी जर शाळा प्रशासनाने दाखवली आणि शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी अशा वाहनांना मज्जाव केला तर वाहतुक कोंडी नक्की कमी होईल. शिवाय नियमित वाहतूक सुद्धा सुरळीत राहील,” असे याबाबत शाळेच्या जवळच असणाऱ्या म्हाडा वसाहतीत राहणारे बाबा गायकवाड यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.


“एस एम शेट्टी शाळा आणि हिरानंदानी हॉस्पिटल भागात बेजाबदारपणे पार्क केलेल्या वाहनांमुळे एवढी वाहतूक कोंडी होते की, २० मिनिटाचा रस्ता पार करायला आम्हाला एक ते दीड तास लागतो. यामुळे मुलांना शाळेत सोडायला उशीर होतो आणि शाळेचे गेट बंद झाल्याने त्यांना शाळेत घेतले जात नाही. या वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला याच मार्गाने घरातून लवकर निघून प्रवास करावा लागतो,” असे याबाबत बोलताना चांदिवली भागात राहणाऱ्या पालकांनी सांगितले.


यासंदर्भात पाठीमागील वर्षी आवर्तन पवईशी बोलताना एस एम शेट्टी स्कूल प्रशासनातर्फे सविता शेट्टी यांनी सांगितले होते की, “आमच्या सर्व बसेस कंत्राट पद्धतीने आहेत, आम्ही त्यांना फक्त शाळा सुटण्याच्या वेळेसच गाड्या शाळेच्या परिसरात उभ्या करण्याची सूचना दिल्या आहेत. पालकांना सुद्धा पाल्याला सोडायला येताना किंवा घ्यायला आल्यावर गाडी प्रवेशद्वारावर उभी करण्यास मनाई केली आहे. वाढलेल्या समस्येला पाहता आम्ही वाहतूक विभागाला पत्र लिहून याबाबत कळवले आहे. तरी लोकांच्या तक्रारी पाहता आम्ही अजून खबरदारी घेवू,” असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी यातील कुठलाच शब्द पाळला नसल्याचे गेल्या दोन आठवड्यापासून येथे लांबचलांब रांगा लावून उभ्या असणाऱ्या बसेस आणि वाहतूक कोंडीवरून समोर येते आहे.

पोद्दार स्कूल प्रशासनाने तर वाहतूक कोंडी करणारी वाहने ही आमची शाळेची वाहने नसून, खाजगी स्कूल बसेस असल्याचे सांगत, ‘आमची वाहने ही शाळेच्या आवारातच उभी राहतात’ असे बोलत वाहतूक कोंडीला आपण जबाबदार असल्यापासून हात झटकले आहेत.

गोपाल शर्मा चौकात शाळेच्या वाहनांना उभे करण्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी

याबाबत साकिनाका वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले “आम्ही शाळांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत कि रस्त्यांवर मुलांना बसमध्ये चढू किंवा उतरवू नये, त्यांनी शाळेच्या आवारातच त्यांच्या गाड्या उभ्या करून मुलांची सोय करावी. गाड्या नंतर विजय विहार समोरील मोकळ्या जागेत उभ्या कराव्यात, परंतु शाळा केवळ एक दिवस सूचनेचे पालन करतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे असतात. आम्ही अडचण करणाऱ्या सर्व शाळांना याबाबत पुन्हा सूचना देतो आणि परिसरात या सगळ्या कारणांनी वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत खबरदारी घेतो.”

गोपाल शर्मा शाळेने याबाबत उत्तर देताना सांगितले कि, “आमची कोणतीच बस रस्त्यावर उभी राहत नसून, शाळेच्या पटांगणात उभ्या राहतात. तिथेच मुलांची बसमध्ये चढण्या उतरण्याची सोय आहे. परिसरात शाळेत मुलांना घेवून येताना स्थानिकांना त्रास होत असल्याबाबत कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. तशी कोणती तक्रार आल्यास आम्ही नक्की काळजी घेवू.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes