भारत देश आज चंद्रावर पोहचला आहे, तो केवळ तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर. भारताने शिक्षणाच्या आणि विद्वतेच्या बळावर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत. परंतु मुंबईचे हृदय समजले जाणाऱ्या पवई, जिथे देशाचे भविष्य घडवणारे घडवले जातात अशी आयआयटी सारखी शैक्षणिक संस्था आहे, तिथेच असाही एक परिसर आहे जिथल्या मुलांना विज्ञान तंत्रज्ञान तर दूरच, शिक्षणापासूनच दूर राहण्याची बारी आली होती, पण रमेश देवरेंच्या रुपात तिथे देवदूत अवतरला आणि आज या ठिकाणची मुले फक्त शिकली नाहीत तर एक आदर्श पिढी सुद्धा तयार होत आहे.
झपाट्याने वाढत चाललेल्या पवईला मुंबईचे हृदय मानले जावू लागले आहे. उंच उंच भागात इमारती, आयआयटी, नीटी, समुद्री प्रशिक्षण संस्था सारख्या शैक्षणिक संस्था पवई मध्ये आहेत. त्याच परिसरात साई-बंगोडा, डोंगरीपाडा, उलटणपाडा, खांबाचापाडा, गावदेवीपाडा असे जवळपास २७ आदिवासी पाडे आहेत, जिथपर्यंत शिक्षणच पोहचू शकले नव्हते. आज जिथे विहार तलाव उभा आहे हे यांचे मूळ ठिकाण होते, परंतु १९१८ मध्ये विहार तलाव बनवताना, येथील जवळपास ४०० परिवारांना बोरीवली राष्ट्रीय उद्यानातील पवईच्या हद्दीत येणाऱ्या भागात हलवण्यात आले. शहराच्या दुसऱ्या सगळ्या भागांचा विकास होत गेला, पण जंगलांच्यामध्ये दडून राहिलेल्या या लोकांचा विकास झालेलाच मात्र नाही. आता देवरे मास्तरांमुळे या पाड्यावरची मुले शिकली आहेत आणि आपल्या भागात विकास ही घडवून आणण्यासाठी धडपडत आहेत.
भांडार नियंत्रक म्हणून एक प्रतिष्ठीत बँकेसाठी काम करणारे आणि घरात गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांसाठी शिकवणी चालवणाऱ्या रमेश देवरे यांना, नेहमीच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिकवण्यात आनंद मिळत असे. असेच कार्य करता करता सन २००० साली त्यांच्या पाहण्यात पवईचा हा भाग आला, जिथे लोक शाळा सोडा, शिक्षण या गोष्टीपासूनच दूर आहेत. शिक्षण हे आमच्यासाठी नाहीच आहे असा समज करून घेतलेल्या या आदिवासी पाड्यांतील लोकांना पाहिल्यानंतर, आपल्याला या भागात शिक्षणाचे बीज रोवायचेच आहे असे मनाशी ठरवून त्यांनी आपली संस्था ‘ज्ञान अमृत शिक्षण प्रसारक मंडळ’च्या माध्यमातून इथे बिजारोपणाची सुरवात केली.
याबाबत आवर्तन पवईशी बोलताना देवरे मास्तर म्हणाले “सुरुवातीला मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्या काळी जवळपास २०००० लोकसंख्या असणाऱ्या त्या आदिवासी पाड्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात, जवळपास १८०० मुले ही शाळेत जाण्या योग्य होती, पण ती शाळेतच जात नव्हती. तिथे शिक्षणाबद्दल जागृकताच नव्हती, त्यामुळे मुलांच्यात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासोबतच, त्यांच्या आई वडील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे माझ्यासाठी महत्वाचे होते. पण मी त्यांच्यातला कोणीच नव्हतो मग ते माझे का ऐकणार असा प्रश्न समोर होता. हे पाहता मी त्या सगळ्या पाड्यांचा म्होरक्या नवशा वळवी यांना गाठले. त्याच भागातील प्रभू उराडे ज्यांच्या शब्दाला तेथील लोक मानत त्यांना पण सोबत घेवून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. ते लोकही बाहेरच जग कामामुळे बघत असल्याने या गोष्टीची जाणीव ठेवून होते. आम्ही सगळ्यांनी मिळून तेथील लोकांना चर्चा आणि प्रात्याक्षिके दाखवून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार करत होतो. सुरवातीच्या काही दिवसांपर्यंत आम्हाला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु आम्ही हार न मानता सतत त्या लोकांसमोर जात होतो आणि आम्हाला पहिली सफलता मिळाली. १०-१५ मुलांचा एक चमू शिक्षणासाठी आम्ही तयार केला आणि गावच्या मध्यभागी असणाऱ्या मंदिरात आम्ही पहिली शाळा भरवली.”
“हळूहळू प्रसार वाढत गेला आणि मुले सुद्धा वाढत गेली. एवढ्या मुलांना बसवण्यासाठी जागा कमी पडू लागली तेव्हा, बाजूच्या मोकळ्या परिसरात एक छोटी शाळा बांधून, काही मुले तिथे बसवायला सुरवात केली. मला एकट्याला सगळे वर्ग सांभाळणे शक्य नव्हते. त्यात जवळपास २० एकर भागात पसरलेल्या सगळ्या पाड्यात मुलांना शिक्षण देण्यासाठी पोहचणे सुद्धा अशक्य होते. तेव्हा मी तेथील स्थानिक थोड्या शिक्षित आणि मुलांना चांगल्या समजू शकतील अशा काही महिला शिक्षिका म्हणून निवडल्या. आज माझ्याकडे १० शिक्षिका आणि ३५० विद्यार्थी सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत १ ली ते 4 थी च्या वर्गात शिक्षण घेत आहेत. अनेक मुले शिक्षण संपवून चांगले आयुष्य जगत आहेत आणि सोबतच नव्या पिढीला शिक्षणाच्या वाटेवर हातभार देत, आपल्या परिसराच्या विकासासाठी सुद्धा झटत आहेत. या पेक्षा मोठी गुरुदक्षिणा ती माझ्यासारख्या शिक्षकाला कोणती.”
“माझ्या या कार्यात मला अनेक सामाजिक संस्थांची साथ मिळाली आहे आणि मिळत राहतेय. शाळेसाठी आणि मुलासाठी लागणारे बरेच साहित्य आणि सहकार्य मला डीटेल फाऊन्डेशन, मेरी, नागराज, सुमित राय, अर्थूर डिसोझा, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक याच्याकडून मिळते आहे. पण सगळ्यात मोठी साथ मिळाली ती आदिवासी ग्रामस्थ मंडळाची त्यांची साथ नसती तर आज मी अनेक मुलांना शिक्षणाच्या वाटेवर आणण्यासाठी कितपत यशस्वी झालो असतो माहित नाही.”
रमेश देवरेंचा, देवरे मास्तर इथेच झाले आणि आज ते या सगळ्यांमधील एक भाग बनून राहिलेले आहेत. मास्तरांनी अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम इथे साजरे करणे सुरु केले. अनेक सण सगळे मिळून आता इथे साजरा करतात. पवई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित, २००४ पासून इथे प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिवस साजरा करणे देवरे मास्तरांनी सुरु केला. एवढेच नाही तर प्रत्येक वर्षी या काळात ते विद्यार्थ्यांना खेळणी आणि अभ्यासाचे साहित्य वाटून शिक्षणासाठी प्रोस्ताहित करतात.
(या कार्यात आपला सहभाग नोंदवून किंवा शिक्षणाला पुढे नेण्यासाठी मदत करू इच्छितांनी रमेश देवरें यांच्याशी ८०८२२६७२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.)
No comments yet.