पवईच्या कचरा समस्येबरोबरच या भागात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी कचराकुंडीची मागणी पालिकेकडे युथ पॉवरकडून केली होती. ज्यानंतर या समस्येची पाहणी करण्यासाठी पालिका ‘एस’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी पवईतील कचऱ्याची समस्या असणाऱ्या भागांना भेट देवून, लवकरच ठिकठिकाणी कचराकुंड्यांची सोय करणार असल्याचे सांगितले.
पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सध्या सर्वत्रच कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचे दिसते. यास पवई सुद्धा अपवाद नाही. पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने पवईत ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याची दखल घेत युथ पॉवर संस्थेकडून जिथे घंटागाडी पोहचू शकत नाही तिथे कचरा उचलण्याची पर्यायी सोय करावी आणि पवईच्या वार्ड क्रमांक ११५ व ११६ मध्ये कचराकुंड्यांची सोय करावी अशी मागणी पालिका ‘एस’ विभागाकडे केली होती.
शुक्रवारी पालिका ‘एस’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे निरीक्षक नलावडे यांनी पवईच्या गौतमनगर, हरिओमनगर, इंदिरानगर, गरिबनगर, चैतन्यनगर, रमाबाई नगर, फुलेनगर भागात भेट देवून येथील स्थानिकांशी चर्चा करून कचऱ्याच्या समस्येची माहिती घेतली.
“पवईला कचऱ्याच्या समस्येने ग्रासलेले आहे. ज्यामुळे लोक आजारी पडत असून, संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. लोकांना नाक उघडे ठेवून रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्याकडे आम्ही एक पत्र देवून पालिकेचे लक्ष वेधले होते. ज्यानंतर आज पालिका अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली असून, लवकरच त्यांच्याकडून या समस्येचे निवारण केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे,” असे आवर्तन पवईशी याबाबत बोलताना युथ पॉवर संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.