जिथे जिथे डॉ. बाबासाहेबांचे पुतळे आणि स्मारके उभे राहतील त्या जागा भीम अनुयायांसाठी ऊर्जा देणारी आहेत. अशी स्थाने जोपर्यँत बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत तोपर्यँत ठिकठिकाणी उभी राहतीलच. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि पुतळे अनधिकृत ठरविणारा अजून जन्माला यायचा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर यांनी केले. पवई येथील उद्यानात भीम अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविला आहे, त्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी ते आले होते, त्यावेळी उपस्थितांना ते मार्गदर्शन करीत होते.
एल अँड टी समोरील बावीस एकर भूखंडावर असणाऱ्या उद्यानाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असताना व या उद्यानात पुतळा बसविण्यास २००८ साली विधिमंडळाने मंजुरी दिली असताना सुद्धा पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या पूर्वसंध्येलाच भीम सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फुटाचा पूर्णाकृती पुतळा येथे बसविला आहे.
विधिमंडळात प्रस्ताव क्रमांक ८५ अन्वये सर्वानुमते मंजुरी मिळाली असतानाही गेल्या ८ वर्षांपासून उद्यानातील राखीव जागेवर बाबासाहेबांचा पुतळा बसविला जात नव्हता.
पुतळा बसवला गेल्यानंतर पालिकेने याला हटवण्याची हालचाल सुरु केली होती, मात्र भीम अनुयायांनी त्या ठिकाणी ठिया मांडल्याने व अनुयायांचे दर्शनासाठी येणारे जथ्थेचे जथ्थे तिथे उपस्थितीत असल्याने पालिकेला ते शक्य होत नाही आहे, त्यामुळे पालिकेने काही काळ माघार घेतली आहे. याचवेळी पालिकेतर्फे येथील काही सुरक्षारक्षकांना निलंबित सुद्धा केले आहे.
मंगळवारी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भीम सैनिकांच्या या कामाचे कौतुक केले. खासदार रामदास आठवले यांना सोबत घेऊन, लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभिकरण करावे अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
“बाबासाहेबांचे स्मारक अथवा पुतळे उभे करणे हा कसलाही गुन्हा नाही. उलट अशी स्मारके ठिकठिकाणी उभी राहिली पाहिजेत. अशा स्मारकातूनच तरुणांना ऊर्जा मिळते” उद्यानाबाहेरील चौकालाही डॉ. बाबासाहेबांचे नाव दयावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पवई तलाव सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बिऱ्हाडे, प्रकाश कांबळे, अनिल लोखंडे, बेरोजगार आघाडीचे अमित तांबे, प्रा. अनिता बिऱ्हाडे, भाऊ पंडागळे, शब्द अक्षयचे संपादक आनंद बिऱ्हाडे, अविनाश मोहिते, प्रभाकर मोरे, सतीश शिंदे, बाबू मेथोडीस, चंद्रकांत ठोंबरे, रोहित पवार, सुनील मोरे आदी मान्यवरांसह शेकडो आंबेडकरी अनुयायी यावेळी उपस्थित होते.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.