पवई परिसरातील आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर भागात रविवार, ३ मे रोजी ६ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे या परिसरातील कोरोना बाधितांचा आकडा १३ तर पवई परिसरातील कोरोना बाधितांचा आकडा ५२ झाला आहे. रविवारी मिळालेल्या बाधितांमध्ये यापूर्वी मिळालेल्या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांचा सुद्धा समावेश आहे.
पवई परिसरात पाठीमागील काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी एकाच दिवसात आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर भागात ६ रुग्ण मिळून आले आहेत. यामध्ये २८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह मिळून आलेल्या ३१ वर्षीय तरुणाच्या २८ वर्षीय पत्नी आणि दीड वर्षीय मुलाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पॉझिटिव्ह मिळून आलेल्यांमध्ये ३१ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, १९ वर्षीय तरुणी आणि २३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळून येत असल्याने शनिवारी या भागात फिव्हर क्लिनिकचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली होती.
“परिसरातील लोकांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण होते. त्यातच आज एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळून आल्याने नागरिकांमध्ये अजूनच भीती वाढली आहे. येथील काही भागात रुग्ण मिळून आलेल्या घरांच्या बाजूला आणि आसपासच्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. काही घरात आजाराने त्रस्त नागरिक असून, त्यांची औषधे सुरु आहेत, अशा लोकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण आहे.” असे याबाबत बोलताना येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
मी पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह?
आयआयटी पवई येथील फुलेनगर भागात आज पालिकेने पॉझिटिव्ह म्हणून सांगितलेल्या ६ बाधितांपैकी एकाला तो पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह? असा प्रश्न सतावत आहे. आवर्तन पवई प्रतिनिधीशी बोलताना येथील एक २३ वर्षीय तरुणाने सांगितले, “मला सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितले की माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कपडे आणि आवश्यक सामान भरून तयार राहण्यास सांगण्यात आले होते. काही वेळातच पुन्हा मला पालिका अधिकाऱ्यांनी फोन करून तू निगेटिव्ह आहे असे सांगितले. त्यामुळे मी संभ्रमात आहे, मी पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह?
या संदर्भात आम्ही पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.