ए-७५ एसी बसच्या बंदीला स्थगिती, फेऱ्या सुरळीत सुरु

सकाळी ८ वाजता पवई ते वरळी आणि संध्याकाळी ५.४५ ला वरळी ते पवई मार्गावर बससेवा राहील सुरु – बेस्ट प्रशासन

ac busहिरानंदानी गार्डन, पवई ते वरळी मार्गावरील ए-७५ या वातानुकूलित बसला मिळणारा अल्पप्रतिसाद व खर्चाच्या प्रमाणात मिळणारे उत्पन्न अतिशय कमी असल्याने, बेस्टच्या तोटय़ात आणखी भर पडू नये यासाठी १ मे २०१६ पासून या मार्गावरील वातानुकूलित सेवा बंद कण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांनी याला कडाडून विरोध दर्शवल्याने व राजकीय हस्तक्षेपामुळे बंदीच्या निर्णय मागे घेत बससेवा सुरूच ठेवण्यात आलेली आहे. यामुळे मुंबई उपनगर आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या सेवेला प्रवाशांना मुकावे लागणे काही काळ तरी टळले आहे.

गेली अनेक वर्षे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून हा मार्ग बंद करण्यासंदर्भात निर्णय निघाल्यापासून विरोध दर्शवला जात होता. मात्र बस सेवा चालवण्यासाठी खर्च अधिक होत असून, त्यातून कमी उत्पन्न परत मिळत आहे. अशा परिस्थितीत वातानुकूलित बस सेवा प्रवासी मिळत नसणाऱ्या तोटय़ाच्या मार्गावर सुरू ठेवणे हे दिवसेंदिवस कठीत होत चालले आहे. हा तोटा कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाची इच्छा नसतानाही या मार्गावरील सेवा बंद करावी लागत असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून म्हणणे आहे.

रस्त्यावर वाढणारी वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीचा विचार करता दररोज पवई ते कोलाबा, चर्चगेट प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी या मार्गावर एसी बससेवा सुरु करण्याची मागणी केली होती. यासाठी काही प्रवासी प्रतिनिधींनी तत्कालीन बेस्ट महाव्यवस्थापक खोब्रागडे यांची भेट घेऊन आपली मागणी ठेवल्यावर, या मागणीला हिरवा कंदील देत ए-७५ ही वातानुकूलित बससेवा हिरानंदानी, पवई ते इलेक्ट्रिक हाऊस सुरु करण्यात आली.

सुरुवातीला मिळणारा भरभरून प्रतिसाद बसची वेळ आणि कामावर जाणाऱ्या लोकांची वेळ यात तफावत निर्माण झाल्याने हळूहळू कमी होऊ लागला आणि अल्प प्रतिसाद लक्षात घेता बसमार्ग कमी करून वरळी पर्यंत करण्यात आला.

या संदर्भात बोलताना या बसने नियमित प्रवास करणारे तिवारी यांनी सांगितले, “माझे ऑफिस ‘विटी’ला आहे. पूर्वी ही बस इलेक्ट्रिक हाऊस पर्यंत जात असताना मी नेहमी याच बसने प्रवास करत असे. मात्र आता ही बस वरळी पर्यंतच जात असल्याने तिथे उतरून पुन्हा नवीन बस पकडून आम्हाला पुढे जावे लागते जे जास्त त्रासदायक ठरत आहे. बसमार्ग सुरु झाल्यावर ती इस्टर्न एक्सप्रेसवरून जात असे, मात्र नंतर तिचा मार्ग बदलून वेस्टर्न एक्सप्रेस मार्गावरून करण्यात आला, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढून अनेक प्रवाशांनी या कारणास्तव या वातानुकूलीत बसने प्रवास करणे बंद केले आहे.”

असे बरेच प्रवासी आहेत ज्यांनी या कारणामुळे त्यातून प्रवास करणे बंद केले आहे. ही बस इलेक्ट्रिक हाऊस पर्यंत पुन्हा सुरु झाली तर बेस्टला त्यांचे प्रवासी नक्की परत मिळतील.

या मार्गावरील सेवा बंद होऊ नये, यासाठी प्रवासी प्रतिनिधित्व म्हणून किमान ४० प्रवाशांनी तरी या बस गाडय़ांचे मासिक पास काढावेत, ज्यामुळे बेस्ट प्रशासनाला या सेवा सुरू ठेवता येतील असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यात ‘आवर्तन पवई’ आणि काही ‘प्रवासी प्रतिनिधी’ बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांना मार्ग व वेळ बदलणे, सुविधा इलेक्ट्रिक हाऊस पर्यंत करणे अशा विविध मागण्या घेऊन भेट घेणार आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!